मध (honey) मध हे सर्वांना परिचयाचे आहे. तसेच ते किती औषधी आहे ते पण माहीत आहे. मध हे विविध प्रकारच्या फुलांमध्ये असते. मधमाश्या त्या फुलांमधून मध शोषून आपल्या शरीरात त्याचा साठा करून मग आपल्या पोळ्यामध्ये लहान लहान कोषात साठा करून ठेवतात. मध हे उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ आहे.
मध हा चिकट, पारदर्शक, सुगंधी, मधुर व पाण्यात विरघळून जाणारे एक द्रव्य आहे. मध हे मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत. एक “माखीयू” व दुसरे “कृतियू” आहे. माखीयु कसे ओळखायचे तर ज्या मधाच्या पोळ्यातील मधमाशी उडवली जात असता तीव्र दंश करते त्या मधाला माखीयू मध असे म्हणतात व ज्या मधाच्या पोळ्यावर दगड फेकून उडवण्याचा प्रयत्न केला असता ज्या माश्या दंश न करता उडून जातात त्यांना कृतियू मध असे म्हणतात. ह्या दोन्ही मधाच्या गुणधर्मात थोडा फार फरक आहे.
मधामुळे रक्तातील लाल कणांची वाढ होते. मधामुळे आपल्या शरीराला उष्णता व शक्ती प्राप्त होते. मधातील आंबट पणामुळे उचकी व श्वसन संस्थेतील विकार दूर होण्यास मद्द होते. मधामध्ये जीवनसत्व “बी” चे प्रमाण अधिक आहे त्यामुळे त्याचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात.
आपल्या आहारात ज्या ठिकाणी साखर व तूप च्या उपयोग केला जातो तेथे मधाचा उपयोग करता येऊ शकतो. साखर अधिक प्रमाणात घेतल्याने पोट फुगणे, अजीर्ण होणे, फोड येणे, मधुमेह होणे असे आजार होऊ शकतात जर मधाच्या उपयोग केला तर असे विकार होण्याचे टळू शकते.
मधहे चपाती व भाकरीला लावून खाता येते. लहान मुले व अशक्त मुलांसाठी मध व दुध हे शक्तिशाली आहे. रोज सकाळी उठल्यावर पाण्यात मध घालून घेतल्याने शरीराची वाढलेली चरबी कमी होवून वजन सुद्धा घटते पण त्यासाठी त्याचे थोडे दिवस सेवन केले पाहिजे.
मधाला उष्णता सहन होत नाही म्हणून मध कधी गरम करू नये किंवा गरम पदार्थात कधी घालू नये. मध व तूप समप्रमाणात कधी घेऊ नये कारण ते घातक आहे. दोन्हीचे प्रमाण विषम पाहिजे.
मध हा शीतल, मधुर, नेत्रास हितकारक, स्वर सुधारणारा, बुद्धीची धरणाशक्ती वाढविण्यासाठी मद्द करते तसेच कोड, खोकला, पित्त, कफ, मेद, क्षय दूर करणारा आहे. हे गुणधर्म खऱ्या मधाचे आहेत. जर खऱ्या मधाची परीक्षा करायची असेल तर मधात पडलेली माशी त्यातून बाहेर येऊ शकेल व थोड्या वेळात उडून जाऊ शकेल तर तो मध खरा आहे हे ओळखावे किंवा मध पाण्यात टाकला तो पाण्यात तळाशी जावून बसतो.
एक चमचा मध आपण एक कप दुधात घालून घेतल्याने आपली शक्ती वाढते. आल्याचा रस व मध समप्रमाण मिक्स करून घेतल्याने सर्दी कमी होते. तसेच एक एक चमचा मध दिवसातून चार वेळा घेतल्याने कफ पण लगेच मोकळा होतो. मधाच्या पाण्यने गुळण्या केल्याने टोनसील्स पण बरे होतात.
मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते व ग्लुकोज रक्तात लगेच मिसळते. म्हणून शरीराला मध पचवण्यास जास्त परिश्रम करावे लागत नाही.
मधाचे अतिरिक्त सेवन करू नये. तसेच खूप दीर्घकाळ पण मधाचे सेवन करू नये. ताप आला असताना मधाचे सेवन करू नये. तूप व मध समप्रमाणा घेऊ नये. तसेच मध कधी गरम करून नये.