पनीर खुबानी : पनीर खुबानी हा पदार्थ खर म्हणजे हैदराबाद येथे प्रसिद्ध आहे. हा पदार्थ स्वीट डिश म्हणून करता येतो. पार्टी किंवा सणावारी पण करता येतो. ह्यामध्ये पनीर, बटाट्याचे आवरण आहे व त्यामध्ये जर्दाळू, काजू व वेलदोड्याचे सारण म्हणून उपयोग केला आहे. त्यामुळे हा प्रकार वेगळाच आहे.
The English version recipes for Paneer Khubani are given in the articles – Here and Here
साहित्य : आवरणा साठी : २५० ग्राम पनीर, २ मोठे बटाटे (उकडून लगदा करून) ३/४ कप आरारूट पावडर, तूप तळण्यासाठी
पाक बनवण्यासाठी : १/२ टी स्पून विलायची पावडर,१ चिमुट केसरी रंग, १/२ किलो साखर, १ थेंब केवडा इसेन्स
सारणा साठी : ५-६ जर्दाळू, थोडे काजूचे तूकडे, थोडे वेलदोड्याचे दाणे
कृती : २ कप पाण्यामध्ये जर्दाळू ५ मिनिटे उकडून घेऊन बिया काढून त्याचे तुकडे करून घ्या. मग त्याच पाण्यात साखर टाकून एक तारी पाक करून त्यामध्ये केसरी रंग, इसेन्स टाकून ठेवा.
बटाटे उकडून सोलून त्याचा लगदा करून त्यामध्ये पनीर किसून व आरारूट पावडर घालून मळून घ्या. नंतर त्याचे लिंबा एवढे गोळे करून त्यामध्ये जर्दाळूचा, काजूचा व वेलदोड्याचा तुकडा ठेवून बंद करून घ्या असे सर्व पनीर बटाट्याचे गोळे तयार करून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून एक एक पनीर बटाट्याचे गोळे गुलाबी रंगावर तळून घ्या. तळून झाल्यावर पाकमध्ये ३० मिनेटे मुरत ठेवावे.
सर्व्ह करतांना वरतून पिठीसाखर भुरभुरावी.