श्रावण महिना : आषाढ महिना संपला की सगळ्यांना श्रावण महिन्याचे वेध लागतात. महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याचे महत्व खूप आहे. श्रावण महिना म्हटले की घरातील स्त्रियाची व मुलीची खूप धावपळ असते. तेव्हा पासून एक-एक सण चालू होतात. श्रावण हा महिना श्रवणाचा महिना आहे. ह्या महिन्यात देवाच्या कहाण्याचे तसेच पोथ्याचे वाचन करतात. ह्या महिन्यात निरनिराळ्या पुस्तकांचे वाचन करून श्रावण महिन्यातील व्रतांची माहिती मिळवली जाते. श्रावण महिन्यात नागपंचमी, श्रावणी सोमवार, मंगळागौर, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्री कृष्ण जन्म हे दिवस महत्वाचे आहेत.
श्रावण महिन्यातील नागपंचमी हा दिवस स्त्रीयासाठी मोठा सण आहे तसेच महाराष्ट्रात हा सण आनंदाने साजरा करतात. ह्या दिवशी स्त्रिया नागाची पूजा करतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया वारुळा जवळ जावून पूजा करायच्या पण आता कालांतराने व शहरी करणामुळे वारुळे राहिली नाहीत. म्हणून आता घरीच नागाची मूर्ती तयार करून, किंवा भिंतीवर नागाचा फोटो लावून पूजा केली जाते. नागाच्या मूर्तीला हळद-कुंकू लावून, दुर्वा फुले वाहून, लाह्या व दुधाचा नेवेद्य दाखवला जातो. ह्या दिवशी नागाची पूजा का करायची तर नाग देवता आपल्या कुळाचा, आपल्या पूर्वजांचा व आपल्या घराण्याचा रक्षण कर्ता आहे म्हणून आपण नाग देवाची पूजा करतो. त्यादिवशी नाग देवाच्या फण्याला दुखवायचे नसते. त्यादिवशी वाटणेघाटणे करायचे नाही, विस्तवावर तवा ठेवायचा नाही. त्यादिवशी पुरणाची दिंड बनवून नैवेद्य बनवला जातो.
नागपंचमी ह्या सणाला स्त्रिया नवीन वस्त्रालंकार लेवून निरनिराळे खेळ खेळतात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, फेर हे खेळ खेळतात. लहान मुलीनं पासून मोठ्या स्त्रिया सर्व खेळामध्ये भाग घेतात. ह्या दिवशी रात्री जागरण केले जाते.
श्रावणातील सोमवार ह्याचे खूप महत्व आहे. ह्यादिवशी सकाळी लवकर उठून गौरीची (पार्वती) यांची पूजा केली जाते. पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी पूजा करून गोडाचा नेवेद्य बनवून मग उपवास सोडला जातो.
श्रावणातील मंगळवार हा तर नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी आनंदाचा दिवस. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली पाच वर्ष श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी करतात. ह्या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुली एकत्र येवून गौरीची पूजा करून स्त्रीयांना हळदी कुकवाला बोलवून रात्री जागरण केले जाते. पहिल्या वर्षी पहिला मंगळवार माहेरी आईच्या घरी करतात. व नंतर पाच वर्ष सासरी करतात व शेवटच्या वर्षी उद्यापन करतात. रात्री जागरण करून वेगवेगळे खेळ खेळले जातात. फुगडी, झिम्मा, कोंबडा, लाटण्याचा खेळ, गोफ, फेर हे खेळ खेळतात. खेळ खेळतांना काही गाणी म्हणतात.
लाटण्याचा खेळ खेळतांना हे गाणे म्हणतात.
लाटा बाई लाटा | चंदनी पेटा
मांमांनी दिला मला | सोन्याचा लोटा
आई मी लहान | केतकीच पान
मांमांना सांग मला | कंबरपट्टा आण
एक सुं सुं | दोन सुं सुं
आपण दोघी मैत्रिणी | नव्या साड्या नेसू
गोफ खेळाचे गाणे
गोफ विणू बाई गोफ विणू
अर्ध्या रात्री गोफ विणू
गरे खा गरे, पोटाला बरे
न खाईल त्याची म्हतारी मरे
मेली तर मेली, कटकट गेली
संसाराला मोकळीक झाली
गोफ विणू बाई गोफ विणू
झिम्मा खेळतांनाचे गाणे
झिम पोरी झिम
कपाळाचे भिग
भिग गेलं उडून
पोरी आल्या पळून
पोरीच पोरी मीच गोरी
आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिमा खेळतो.
नवीन लग्न झालेल्या मुलींना पतीचे पाव हे उखाण्यात घेण्याचा आग्रह धरला जातो. मंगळा गौरीला खेळ खेळतांना मुली आपल्या पतीचे नाव उखाण्यात घेतात. काही उखाण्यातील नावे आहेत.
१) सुया बाई सुया पोलादी सुया, आम्ही दोघी फुगडी खेळू नणंद भावजया.
२) खोल खोल विहिरीला उंच उंच चिरे, उंच उंच चिरे, तुझी माझी फुगडी गरगर किरे.
३) चिपाड बाई चिपाड, जोधल्याचे चिपाड, दादांनी बायको केली आमच्या पेक्षा धिपाड
४) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान _________ रावांचे नाव घेते राखते तुमचा मान.
५) शीतल चांदण पडलं रामाच्या रथात _________ रावांच्यासह मी आहे संसार सुखात.
नारळी पौर्णिमा हा सण कोळी लोक मनवतात. ते आपल्याला रोजी रोटी देणाऱ्या समुद्राची पूजा करतात व नारळी पौर्णिमा हा दिवस नाच-गाणी म्हणून साजरा करतात. तसेच रक्षा बंधन हा सण महाराष्ट्रीयन लोकांचा आहे त्यादिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याची हमी देतो.
श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी फार महत्वाची आहे. संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा व संध्याकाळी गणपती बाप्पांना मोदकाचा नेवेद्य दाखवावा. श्रावणातील संकष्टी चतुर्थीचा उपवास केला तर असे म्हणतात की आपल्याला १२ चतुर्थी केल्याचे पुण्य लाभते.
श्री कृष्ण जन्मउत्सव : श्री कृष्ण जन्म हा रात्री साजरा केला जातो. त्यादिवशी उपवास केला जातो. दुसऱ्या दिवशी दहीहंडी हा सण साजरा केला जातो.