आले-लसूण-मिरची लोणचे: आले-लसूण-मिरची लोणचे हे गुणकारी आहे. आल्याच्या सेवनाने भूक चांगली लागते. तोंडाला रुची येते. अन्नाचे पचन होते व कफ व वायूचे रोग होत नाहीत. तसेच गळा व जीभ स्वच्छ राहते.
लसूण हे खूप गुणकारी आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगले खाद्यपदार्थ व रसायन आहे. लसूणमध्ये जीवनसत्व ए, बी, सी आहे.
लोणच्यामध्ये मिरच्या घातल्यातर लोणच्याची चव उत्कृष्ट लागते.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ८०० ग्राम बनते
साहित्य:
२५० ग्राम आले
२५० ग्राम लसूण
२५० ग्राम मिरच्या
१/२ वाटी मोहरी डाळ
१/२ पेक्षा कमी जिरे
१ टी स्पून मेथी दाणे
१ टी स्पून हिंग
१ टी स्पून कलोजी (कांद्याचे बी)
१/२ कप व्हेनिगर (पांढरे)
१ टे स्पून चिंचेचा कोळ
गुळ अंदाजे
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून हळद, मीठ
कृती:
आले धुवून, स्वच्छ करून तुकडे करावेत. लसूण सोलून तुकडे करावेत, मिरच्याचे देठ काढून तुकडे करावेत.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेले आले-लसूण-मिरची घालून १-२ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये मोहरी डाळ, जिरे, मेथ्या, कलोजी घालून थोडे परतून घेऊन मग लाल मिरची पावडर, हळद, मीठ घालावे.
दुसऱ्या एका भांड्यात व्हेनीगर, चिंच, गुळ घालून थोडे उकळवून घेऊन आले-लसूणच्या मिश्रणामध्ये घालावे. सर्व मिश्रण एकत्र करून १-२ मिनिट परतून घ्या. तेल गरम करून थंड करा व मिश्रणामध्ये घालून थंड झाल्यावर बरणीत भरून घ्या. लोणच्याची बरणी ३-४ दिवस उन्हामध्ये ठेवा.
आले-लसूण-मिरचीचे लोणचे चांगले मुरलेकी सर्व्ह करा.