उपवासाचे बटाट्याचे पापड: बटाट्याचे पापड हे आपण उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळीसुद्धा तळून खाऊ शकतो. बटाट्याचे पापड हे बनवून एक वर्ष सुद्धा टिकतात. चवीला चवीस्ट लागतात, बनवायला सोपे व लवकर होणारे आहेत. मी इथे जे माप दिले आहे त्यामध्ये फक्त २० पापड होतात जर तुन्हाला जास्त बनवायचे असतील तर त्याचे माप म्हणजे जेव्हडा उकडलेल्या बटाट्याचा गोळा असेल तेव्हडेच साबुदाणा पीठ घ्यावे. तसेच लाल मिरची पावडर, मीठ व जिरे पावडर आपल्याला टेस्ट जशी हवी असेल तेव्हडी घ्यावी. पापड लाटून झाल्यावर चांगले वाळवून डब्यात भरून ठेवावे. जेव्हा पाहिजे तेव्हा काढून तळून घ्यावेत.
The English language version of this Papad recipe and its preparation method can be seen here – Upvasache Potato Papad
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० पापड
साहित्य:
२ कप उकडलेल्या बटाट्याचा लगदा
२ कप साबुदाणा पीठ
२ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टी स्पून जिरे पावडर
मीठ चवीने
१ टे स्पून तूप
कृती:
५-६ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, सोलून, किसून घेऊन थंड करायला ठेवा.
एका परातीत उकडलेला बटाटा, साबुदाणा पीठ, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, मीठ घालून चागले मळून घ्या. मळलेल्या पिठाला तुपाचा हात लाऊन परत मळून घ्या.
बटाट्याच्या पीठाचे एक सारखे छोट्या लिंबा एव्ह्डे २० गोळे बनवून घ्या. एक एक गोळा घेऊन छोट्या पुरी सारखा लाटून घ्या. अशा प्रकारे सर्व गोळे लाटून घ्या. एका प्लास्टिक पेपरवर सर्व पापड पसरवून वाळत ठेवा. पापड चांगले वाळले की डब्यात भरून ठेवा. पाहिजे तेव्हा पापड डब्यातून काढून तेलात किंवा तुपात तळून घ्या. हे पापड उपासासाठी किंवा जेवणात सुद्धा छान लागतात.