खिम्याच्या पुऱ्या: खिम्याच्या पुऱ्या ह्या नाश्त्याला बनवायला चांगल्या आहेत. मी ह्या पुऱ्या बनवण्यासाठी चिकनचा खिमा वापरला आहे.
बनवण्यसाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ पुऱ्या बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
१ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
१ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
सारणासाठी:
२५० ग्राम चिकन खिमा
१ टे स्पून तेल
२ मोठे कांदे (चिरून)
२ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टी स्पून हळद
२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
मसाला बनवण्यासाठी:(वाटून घ्या)
१ टी स्पून धने-जिरे
६ लवंग
१/२” दालचीनी तुकडा
२५० ग्राम वनस्पती तूप तळण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, गरम तेल व मीठ घालून घट्ट पीठ मळून घेऊन बाजूला ठेवा.
सारणासाठी: चिकन खिमा स्वच्छ धुवून बाजूला ठेवा, कांदा बारीक चिरून घ्या. गरम मसाला वाटुन घ्या. आले-लसूण पेस्ट करून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून घेऊन कांदा घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घालून एक मिनिट परतून घेऊन चिकन खिमा व मीठ घालून खिमा मंद विस्तवावर २-३ मिनिट परतून घेऊन १/२ कप पाणी घालून चिकन खिमा शिजवून घ्या. मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, लिंबूरस घालून मिक्स करून १०-१२ मिनिट खिमा शिजवून घेऊन थंड करायला बाजूला ठेवा.
पुऱ्या बनवण्यासाठी: भिजवलेल्या पिठाचे एक सारखे २० गोळे बनवा. एक गोळा घेऊन थोडा लाटून त्यामध्ये १ चमचा खिम्याचे सारण भरून पुरी बंद करून थोडी लाटून घ्या. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्या.
कढाईमध्ये तूप गरम करून पुऱ्या तळून घ्या.
गरम गरम पुऱ्या सर्व्ह करा.