ज्वारीच्या पिठाच्या चकल्या: आपण नेहमी भाजणीच्या, तांदळाच्या पिठाच्या किंवा मुगाच्या डाळीच्या चकल्या करतो. ज्वारीच्या पिठाच्यापण चकल्या बनवता येतात. आपल्या घरात जेव्हा भाजणी नसते. त्यावेळी अश्या प्रकारच्या चकल्या बनवता येतात. चकली बनवताना त्यामध्ये खसखस, धने-जिरे पावडर, हिंग वापरले आहे त्यामुळे चव छान लागते.
The English language version of this Jowar Flour Chakli can be seen here – Tasty Jowar Atta Chakli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३०-३५ चकल्या बनतात
साहित्य:
४ कप ज्वारीचे पीठ (ताजे)
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून तीळ
१ टी स्पून खसखस
१ टे स्पून धने-जिरे पावडर
१ टी स्पून हिंग
मीठ चवीने
२ कप गरम पाणी (उकललेले)
१/२ कप तेल
तेल चकल्या तळण्यासाठी
कृती:
ज्वारीचे पीठ एका परातीत घेऊन त्यामध्ये लाल मिरची पावडर, तीळ, खसखस, धने-जिरे पावडर, हिंग घालून एक सारखे करून घ्या.
एका जाड बुडाच्या पातेल्यात पाणी, तेल व मीठ घालून उकळून घ्या. मग त्यामध्ये मिक्स केलेले पीठ घालून एक सारखे करून घेऊन भांड्यावर झाकण ठेवा व तसेच दोन तास बाजूला ठेवा. म्हणजेज्वारीचे पीठ फुलून येईल. दोन तासाने झाकण काढून चकलीच्या सोरया मध्ये जेव्हडे पीठ बसेल तेव्हडेच पीठ घेऊन चांगले मळून घ्या. सोरयाला आतून पाण्याचा हात लावून मळलेले पीठ घालून एका प्लास्टिकच्या पेपरवर चकल्या कराव्यात.
एका कढईमधे तेल गरम करून घ्या. तेल तापलेकी चकली हळुवार सोडा. चकली सोडतांना विस्तव मोठा ठेवा. मग मंद विस्तवावर दोनीही बाजूनी चकली तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व चकल्या बनवून तळून घ्या. थंड झाल्यावर प्लास्टिकच्या पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.