खव्याचे-खोया-मावा पेढे: घरच्या घरी बनवा खव्याचे पेढे. खव्याचे पेढे आपण मिठाईच्या दुकानातून आणतो ते किती महाग पडतात. जर असे पेढे आपण घरी कमी खर्चात जास्त बनवले तर किती छान होईल. हे पेढे १०-१५ मिनिटात बनतात तसेच बनवायला सुद्धा सोपे आहेत. खव्याचे पेढे बनवतांना फक्त पिठीसाखर, मिल्क पावडर व वेलचीपूड वापरली आहे.
The English language version of the same Peda recipe can be seen here – Homemade Mawa Pedha
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ३० बनतात
साहित्य:
२५० ग्राम खवा (ताजा)
१/२ कप पिठीसाखर
१/२ कप मिल्क पावडर
१ टी स्पून वेलची पूड
सजावटीसाठी केशर
कृती: प्रथम खवा हाताने मोडून एक सारखा करावा किंवा मोठ्या किसणीने किसून घ्यावा.
एक कढई घेऊन त्यामध्ये खवा व पिठीसाखर मिक्स करून घेऊन मंद विस्तवावर मिश्रण घट्ट होई परंत ठेवा. मधून मधून सारखे हालवत रहा. मिश्रण थोडे घट्ट होत आले की विस्तव बंद करून कढई खाली उतरवून ठेवा.
मग कढई मधील मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर व वेलचीपूड घालून मिश्रण चांगले मळून घ्या. मळलेल्या पीठाचे एक सारखे ३० गोळे बनवा व त्याला पेढ्याचा आकार द्या. पेढ्याचा आकार देतांना वरती केशरच्या काड्या थोड्या दाबून लावा. मग एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.