पोटली सामोसा: पोटली सामोसा हा मुलांना नक्की आवडेल कारण त्याचा पोटलीचा आकार अगदी आकर्षक आहे, तसेच तो बनवतांना उकडलेला बटाटा, गाजर व हिरवा ताजा मटार वापरला आहे. हे सामोसे बनवतांना त्यामध्ये मसाला वापरला नाही. फक्त आले व हिरवी मिरची वापरली आहे.
The English language version of this Samosa recipe can be seen here – Delicious Potli Samosas
साहित्य:
आवरणासाठी:
२ कप मैदा
२ टे स्पून गरम तुपाचे मोहन
१ टी स्पून ओवा मीठ चवीने
सारणासाठी:
३ मोठे बटाटे
१ मध्यम आकाराचे गाजर
१/२ कप हिरवे मटार
१” आले तुकडा
५-६ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून लिंबूरस
मीठ चवीने
१ टी स्पून धने पावडर
१ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
तेल पोटली समोसा तळण्यासाठी
कृती: आवरणासाठी: मैदा, कडकडीत तुपाचे मोहन, मीठ ओवा व थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून अर्धा तास बाजूला ठेवा. मळलेल्या पीठाचे १२-१५ एक सारखे गोळे बनवा.
सारणासाठी: गाजर धुऊन चिरून घ्या. बटाटे उकडून, सोलून, कुस्करून घ्या. गाजर व हिरवे मटार वाफवून घेऊन पाणी काढून घ्या. हिरवी मिरची व आले बारीक चिरून घ्या.
उकडलेले बटाटे, मटार, गाजर, हिरवी मिरची, आले, मीठ, लिंबूरस, धने पावडर घालून मिक्स करून घ्या. तूप गरम करून त्यामध्ये जिरे घालून मग बटाट्याच्या मिश्रणात घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या.
पोटली सामोसा करीता: मळलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून घेऊन पुरीच्या कडेनी १/२” च्या उभ्या चिरा कापून घ्या मग मध्ये थोडे सारण भरून पुरी बंद करून पोटली सारखा आकार देऊन वरती फुला प्रमाणे आकार आला पाहिजे. अश्या प्रकारे सर्व समोसे बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन सर्व समोसे छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम पोटली समोसे पुदिना चटणी बरोबर किंवा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.