होममेड नान कटाई: नान कटाई ही भारतातील एक पारंपारिक स्वीट्स आहे. ह्यालाच आपण कुकीज सुद्धा म्हणू शकतो. नान कटाई ही आपल्याला नाश्त्याला किंवा चहा बरोबर बनवू शकतो. नान कटाई बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनणारी आहे. नान कटाई बनवण्यासाठी मी मैदा, रवा व बेसन वापरले आहे, आपण मैद्याच्या आयवजी गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकतो. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेकिंगसाठी वेळ: १५-१८ मिनिट
वाढणी: २० बनतात
साहित्य:
१ कप मैदा
१/२ कप बेसन
१/४ कप रवा
१ टी स्पून बेकिंग पावडर
१ कप बटर
१ कप साखर (मिक्सरमध्ये बारीक करून)
१ टी स्पून वेलचीपूड
सजावटीसाठी काजू/बदाम/पिस्ते
कृती:
प्रथम मैदा, बेसन, रवा व बेकिंग पावडर चाळणीने चाळून घ्या.
एका बाउलमध्ये बटर व पिठीसाखर मिक्स करून चांगली फेटून घेऊन त्यामध्ये चाळलेला मैदा, वेलचीपूड घालून चांगले मळून घेऊन त्याचे एक सारखे २० गोळे बनवून थोडेसे मधून बोटानी चपटे करून वरतून एक बदाम किंवा काजू किंवा पिस्ता लावा. एका नॉन स्टिक माईक्रोवेव डीशला तुपाचा हात लाऊन बनवलेली नान कटाई मांडून १० मिनिट तसेच ठेवा.
माईक्रोवेव चालू करून प्रीहीट करून घ्या. मग १८० डिग्री वर ठेवून १० मिनिट वर सेट करून नान कटाईची प्लेट आत ठेवून बेक करायला ठेवा. १० मिनिट झाल्यावर माईक्रोवेव उघडून परत ५ मिनिट सेट करून परत बेक करायला ठेवा. मग प्लेट बाहेर काढून नान कटाई थंड करायला ठेवा.
नान कटाई थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.