मासवड्या : मासवड्या ह्या जेवणामध्ये साईड डीश म्हणून बनवता येतात. ह्या वड्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. तसेच ही पूर्वीच्या काळातील डीश आहे. ह्या वड्या बनवायला जरा वेळ लागतो पण खूप टेस्टी लागतात. तसेच त्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक सुद्धा आहेत. ह्या वड्यांचे आपण कालवण सुद्धा बनवू शकतो.
The English language version of this Maswadi recipe can be seen here – Traditional Maharashtrian Style Maswadi
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १२-१५ वड्या
साहित्य: सारणासाठी:
१ मध्यम आकाराचा कांदा (बारीक चिरून)
७-८ लसून पाकळ्या (बारीक चिरून)
१” आले तुकडा (बारीक चिरून)
१ हिरवी मिरची (बारीक चिरून)
१ टे स्पून तीळ
१ टी स्पून खसखस
२ टे स्पून सुके खोबरे (किसून)
२ टे कोथंबीर (धुवून बारीक चिरून)
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/८ टी स्पून हिंग
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
आवरणासाठी:
१ कप बेसन
१ टे स्पून तेल
१ टी स्पून लाल मिरची
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लसून (पेस्ट)
मीठ चवीने
कृती: सारणासाठी: कांदा. आले-लसून-हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. सुके खोबरे किसून घ्या. कोथंबीर धुवून कोरडी करून बारीक चिरून घ्या.
एका कढईमधे किसलेले खोबरे गुलाबी रंगावर भाजून बाजूला ठेवा. मग तीळ व खसखस कोरडी भाजून बाजूला ठेवा. त्याच कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले-लसून, हिरवी मिरची घालून गुलाबी रंगावर परतून घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मग वाटलेले कांदा-आले-लसून भाजलेले सुके खोबरे, खसखस, तीळ, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धने-जिरे पावडर, कोथंबीर, हिंग मिक्स करून सारण तयार करून बाजूला ठेवा.
आवरणासाठी: दोन कप पाणी उकळून घेवून त्यामध्ये लसून पेस्ट, लाल मिरची पावडर, मीठ, हळद, बेसन घालून मिक्स करून शिजवून घ्या. मिश्रण थोडे घट्टच शिजवून घ्या. मग थोडे कोमट असतांना एका प्लास्टिक पेपरवर मिश्रण थोडे जाडसर पसरवून घ्या. मग त्यावर तयार केलेले सारण पसरवून हळूहळू त्याची घट्ट वळकटी करून घ्या, वळकटी करतांना प्लास्टिकच्या पेपरचा वापर करून घ्या. म्हणजे एकदा वळण घेतले की प्लास्टिक पेपरने थोडे दाबून वरतून प्लास्टिक काढून परत कळवून घ्या परत प्लास्टिक पेपरने दाबून घ्या अश्या प्रकारे गोल वळकटी करून एक सारखे दाबून घ्या. मग त्याच्या गोल गोल चकत्या कापून घ्या. ह्या वड्या नुसत्या खायला सुद्धा छान लागतात.