मासवड्याची ग्रेव्ही: ह्या आगोदरच्या पोस्टमध्ये आपण मासवड्या कश्या बनवायच्या ते पाहिले, आता आपण मासवड्याचे कालवण कसे बनवायचे ते पाहुया. मासवड्याचे कालवण ही महाराष्ट्रातील फार जुनी लोकप्रिय डीश आहे. विदर्भ किंवा मराठवाडा ह्या भागामध्ये ही डीश लोकप्रिय आहे. ह्याचे कालवण छान झणझणीत असते व भाकरी बरोबर किंवा गरम गरम भाता बरोबर खूप छान टेस्टी लागते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
मासवड्याचे साहित्य व कृती येथे पहा- How to Make Maswadi at Home
ग्रेव्हीचे साहित्य:
मसाला बनवण्यासाठी:
१ कप ओला नारळ (खोऊन)
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
८-१० लसून पाकळ्या
१” आले तुकडा
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून तेल
ग्रेव्ही बनवण्यासाठी:
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ छोटा टोमाटो (बारीक चिरून)
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
कोथंबीर सजावटीसाठी
कृती:मसाला बनवण्यासाठी: एका कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा, आले-लसून थोडे भाजून घ्या मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून थोडा परतून त्यामध्ये लाल मिरची पावडर घालून थोडी परतून विस्तव बंद करून मिक्सरमध्ये भाजलेले खोबरे, गरम मसाला घालून वाटण बारीक वाटून घ्या.
ग्रेव्ही बनवण्यासाठी: कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हिंग, बारीक चिरलेला कांदा व टोमाटो घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये वाटलेले वाटण, हळद, मीठ घालून थोडे परतून दोन वाट्या पाणी घालून मसाला मध्यम विस्तवावर चांगला शिजवून घ्या.
मासवड्याची ग्रेव्ही सर्व्ह करतांना एका बाऊलमध्ये दोन मासवड्या ठेवून त्यावर गरम गरम ग्रेव्ही घालून कोथंबीरीने सजवून भाकरी बरोबर किंवा भाता बरोबर सर्व्ह करा.