तिळगुळाची करंजी: तिळगुळाची कारंजी हा एक करंजीचा निराळा प्रकार आहे. आता पौष महिना आला की मकर संक्रांत येते त्या दिवशी महाराष्टात मकर संक्रांत हा दिवस उस्ताहानी साजरा करतात महाराष्ट बरोबर उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये सुद्धा हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करतात. उत्तर प्रदेश मध्ये करंजी ही ह्या दिवशी मुद्दामून बनवतात. करंजी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरून करता येते.तिळगुळाची करंजी चवीला खूप छान लागते. विदर्भात अश्या प्रकारची करंजी बनवली जाते.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी:१८-२० करंज्या बनतात
साहित्य:
सारणासाठी:
एक कप खमंग भाजलेला तीळाचा कुट
१ कप गुळ चिरून
१/२ कप सुक्या खोबऱ्याचा कीस
२ टे स्पून खारीक पावडर
१ टे स्पून खसखस
१ टी स्पून वेलचीपूड
आवरणासाठी:
१ कप कणीक गव्हाची
१ कप मैदा
३ टे स्पून तेल गरम
मीठ चवीने
दुध पीठ घट्ट मळण्यासाठी
तूप करंजी तळण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व तेलाचे मोहन घालून मिक्स करून घ्या मग दुध वापरून पीठ घट्ट मळून बाजूला ठेवा.
सारणासाठी: तीळ भाजून त्याचा कुट करुन घ्या. गुळ किसून घ्या. सुके खोबरे किसून भाजून बाजूला ठेवा. खारीक व खसखस थोडेसे तूप घालून भाजून घ्या. सर्व जीनस एकत्र करून दुधाचा हबका मारून सारण एकसारखे करून घ्या.
मळलेल्या पीठाचे एक सारखे १८-२० गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून घ्या. त्यामध्ये १ टे स्पून सारण भरून पुरी मुडपून करंजी सारखा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या. करंजी बनवली की ओल्या कापडात ठेवा म्हणजे तळताना करंजी फुटणार नाही.
कढईमधे तूप गरम करून घ्या व सर्व करंज्या मंद विस्तवावर गुलाबी रंगावर तळून घ्या. गुळ वापरला आहे त्यामुळे करंजी छान खमंग लागते. सर्व्ह करतांना साजूक तुपा बरोबर सर्व्ह करा.