लाल भोपळ्याचा पराठा: लाल भोपळ्याचा पराठा ह्यालाच लाल भोपळ्याच्या घाऱ्या सुद्धा म्हणतात. घाऱ्या बनवण्यासाठी लाल भोपळा , गव्हाचे पीठ, बेसन, गुळ व दुध वापरले आहे. लाल भोपळा हा शीतल, रुची उत्पन करणारा, मधुर, व पित्तशामक आहे. तसेच गुल व गव्हाचे पीठ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
सकाळी नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ पराठे बनतात
साहित्य:
१ कप लाल भोपळ्याचा कीस
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून बेसन
१/२ कप गुळ
मीठ चवीने
दुध पीठ भिजवण्यासाठी
तूप पराठ्याला वरतून लावण्यासाठी
कृती:
प्रथम लाल भोपळा धुवून, त्याची साले काढून, किसून घ्या. गुळ किसून घ्या. एका कढईमधे किसलेला लाल भोपळा वाफवून घेवून थंड करायला ठेवा. कीस थोडा कोमट झालाकी त्यामध्ये गुळ व चवीला मीठ घालून मिक्स करून १० मिनिट बाजूला ठेवा. मग त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन व थोडे दुध घालून घट्ट पीठ मळून घेवून १०-१५ मिनिट झाकून बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पीठाचे एक सारखे चार गोळे करून पराठा लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर लाल भोपळ्याचा पराठा थोडे बाजूनी तेल सोडून छान खमंग भाजून घ्या.
गरम गरम लाल भोपळ्याचा पराठा साजूक तूप घालून सर्व्ह करा.
The Marathi language video of this red punpkin recipe and preparation method can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=3kxpqC5NJvc