खानदेशी ज्वारीच्या पीठाचे धामोडे: खानदेश म्हंटले की तेथील खाण्याचे वेगवेगळे चमचमीत पदार्थ आठवतात. त्या भागातील लोणची, पापड सुद्धा प्रसिध्द आहेत. ज्वारीच्या पीठाचे धामोडे म्हणजे छोटे छोटे थापून केलेले पापड असे म्हणता येईल.
ज्यामध्ये ज्वारीचे पीठ वापरून भिजवून मग शिजवून त्यामध्ये मिरची, हळद, मीठ ओवा व मीठ घालून कापडावर छोटे पापड घालायचे. हे घामोडे तळ्यावर खूप टेस्टी लागतात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ७०-८० बनतात
साहित्य:
२ कप ज्वारीचे पीठ
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून हळद
1 टे स्पून तीळ
१ टे स्पून ओवा
मीठ चवीने
कृती: प्रथम रात्री ज्वारीचे पीठ थोड्या पाण्यात भिजत ठेवावे म्हणजे ते सकाळ परंत आंबते. सकाळी धामोडे करण्याच्या आगोदर ३ कप पाणी उकळायला ठेवावे, पाण्याला उकळी आलीकी त्यामध्ये आंबवलेले ज्वारीचे पीठ घालून हलवत रहावे गुठळी होता कामा नये. मग त्यात लाल मिरची पावडर, हळद, तीळ, ओवा व मीठ घालून मिक्स करून घ्या.
एका जाड ओल्या कापडावर छोटे छोटे धामोडे घालावे. व कडक उन्हात वाळत घालून परत दुसऱ्या दिवशी उलट करून कडक उन्हात वाळवावे उलट करतांना कापडाला मागच्या बाजूनी पाणी शिंपडावे मग घामोडे उलट करावे. २-३ दिवस उन्हात वाळल्यावर मग डब्यात भरून ठेवावे. तळून खावे.
करून बघा तुम्हला खूप आवडतील अगदी टेस्टी लागतात.