नाचणीचे टेस्टी कुरकुरीत पापड: नाचणीचे पापड कोकण ह्या प्रांतात लोकप्रिय आहेत. नाचणीचे पापड बनवायला सोपे आहेत व टेस्टी लागतात. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्यं आहेत. नाचणीचे पापड बनवतांना त्याचे पीठ करून त्याला उकड काढून मग बनवायचे असतात.
आपण नाचणीचे पापड वर्षभरासाठी बनवू शकता पाहिजे तेव्हा तळून खा. उन्हाळा चालू झालाकी महिला वाळवण करतात म्हणजेच वर्षभराचे पापड, लोणची, पापड्या, कुरड्या बनवतात . नाचणीचे पापड हा त्यातला एक प्रकार आहे.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १/२ कीलोग्राम बनतात
साहित्य:
१/२ किलो ग्राम नाचणीचे पीठ
१ टे स्पून तीळ
१ टे स्पून जिरे
१ टी स्पून हिंग
१ टी स्पून पापड खार
कृती: प्रथम नाचणी धुवून वाळवावी मग मिक्सरमध्ये किंवा गिरणीतून दळून आणावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ लिटर पाणी गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये हिंग, जिरे, तीळ, पापड खार, मीठ घालून पाणी उकळल्यावर नाचणीचे पीठ घालून मिक्स करून घ्या. हळूहळू सारखे हलवत रहा गुठळी होता कामा नये.
पीठ शिजलेकी थोडे पीठ परातीत काढून थोडे थंड झाले की मळून एका प्लास्टिक पेपरला थोडेसे तेल लावून पापड लाटून घ्या. पापड थोडा मोठा लाटून एका लहान वाटीने छोटे छोटे पापड कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व्ह पापड बनवून उन्हात वाळवून मग डब्यात भरून ठेवा.