मऊ लुसलुशीत पाकातील रवा बेसन लाडू: रवा बेसन लाडू बनवण्यसाठी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण बेसन लाडू किंवा रवा नारळ लाडू बनवतो आता रवा बेसन लाडू बनवून बघा नक्की आवडतील.
दिवाळीच्या फराळासाठी अश्या प्रकारचे लाडू बनवायला मस्त आहेत. दिवाळी फराळ म्हंटले की लाडू हवेतच त्याशिवाय फराळाला शोभा नाही. रवा बेसन लाडू चवीस्ट लागतात व रंगाने सुद्धा आकर्षक दिसतात. तसेच ते छान मऊ लुसलुशीतलागतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २२ लाडू बनतात
साहित्य:
२ कप थोडा जाड रवा, १ कप बेसन
३/४ कप तूप किंवा निम्मे साजूक तूप व निम्मे वनस्पती तूप
१/४ कप दुध
१ टी स्पून वेलचीपूड
काजू-बदाम-किसमिस
पाक बनवण्यसाठी:
२ कप साखर, १ कप पाणी
कृती: प्रथम एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून मिक्स करून छान गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा मंद विस्तवावर भाजून झाल्यावर खाली ताटात काढून घ्या.
मग त्याच कढईमधे परत तूप घालून बेसन घालून मिक्स करून घ्या. बेसन सुद्धा मंद विस्तवावर खमंग भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर त्यामध्ये दुध घालून मिक्स करून रवा भाजलेल्या मिश्रणावर घाला व चांगले मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये काजू बदाम किसमिस घालून मिक्स करून घ्या.
परत त्याच कढईमधे साखर व पाणी घालून मंद विस्तवावर एक तारी पण थोडा चिकट असा पाक तयार करून घ्या. मग त्यामध्ये रवा बेसनचे मिश्रण घालून एक सारखे करून घ्या. विस्तव बंद करून मिश्रण थंड होई परंत झाकून ठेवा. मधून मधून झाकण काढून हलवून घ्या.
रवा बेसनचे मिश्रण थंड झालेकी चांगले मळून घेवून छान गोल गोल लाडू बनवून घ्या. अश्या प्रकारे सर्व लाडू वळून झाल्यावर घट्ट झाकणाच्या स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.