महाराष्ट्रीयन स्टाईल आंबटगोड शिमला मिरची भाजी ग्रेव्ही: शिमला मिर्चची भाजी लहानमुलाना आवडते. ह्या आगोदर आपण शिमला मिरचीची भाजी बेसन पेरून व पंजाबी स्टाईल व भरलेली शिमला मिरचीचे प्रकार बघितले. आता आपण कोकणी स्टाईल आंबटगोड शिमला मिरचीची भाजी किंवा ग्रेव्ही बघणार आहोत.
कोकण ह्या भागात भाजीमध्ये नारळ वापरला जातो त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते. अश्या प्रकारची भाजी बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. ह्या भाजीमध्ये ओला नारळ बारीक वाटून घातला आहे. तसेच तीळ व शेंगदाणे भाजून कुटून घातले आहेत. चिंच गुळ व गोडा मसाला वापरला आहे त्यामुळे छान आंबटगोड चव येते तसेच थोडीशी दबदबीत आहे त्यामुळे चपाती बरोबर टेस्टी लागते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ मध्यम आकाराच्या शिमला मिरची
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
१ टे स्पून तीळ (भाजून, कुटून )
१ टे स्पून शेंगदाणे (भाजून, कुटून)
१/२ टे स्पून गोड मसाला
१/२ टी स्पून धने-जिरे पावडर
१/४ कप ओला नारळ (खोऊन)
१ टे स्पून चिंच कोळ, १ टे स्पून गुळ
१ टे स्पून ओला नारळ (सजावटीसाठी)
१ टे स्पून कोथंबीर
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून मेथी दाणे
१/४ टी स्पून हिंग
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
कृती: प्रथम शिमला मिरची स्वच्छ धुवून बिया काढून बारीक चिरून घ्या. शेंगदाणे व तीळ भाजून कुटून घ्या. चिंच भिजत घालून कोळ काढून घ्या. ओला नारळ खोऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. कांदा व कोथंबीर चिरून घ्या.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, मेथ्या व हिंग घालून मग चिरलेला कांदा घालून थोडा परतून त्यामध्ये आले-लसून-हिरवी मिरची घालून थोडी परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, चिरलेली शिमला मिर्च घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवून मंद विस्तवावर पाच मिनिट शिजवून घ्या.
कढईवरील झाकण काढून त्यामध्ये लाल मिरची पावडर, वाटलेला नारळ, चिंचेचा कोळ घालून मिक्स करून २-३ मिनिट भाजी शिजवून घ्या. मग त्यामध्ये तीळ व शेंगदाणे कुट, गोडा मसाला घालून १/२ वाटी पाणी घालून, चवीने मीठ, गुळ व कोथंबीर घालून मिक्स करून २ मिनिट शिजवून घ्या.
गरम गरम आंबटगोड शिमला मिरची भाजी चपाती बरोबर सर्व्ह करा.
The video of the same Bhaji recipe in Marathi can be seen her – Ambat God Shimla Mirch Vegetable