टेस्टी पनीर पराठा: पनीर पराठा ही डीश मुलांना शाळेत जातांना डब्यात हेल्दी व पौस्टीक आहे. पनीर पराठा आपण नाश्त्याला किवा जेवणात सुद्धा सर्व्ह करू शकता. पनीर आपण घरी सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. घरी पनीर कसे बनवायचे ते आमच्या साईटवर दिले आहे.
पनीर पराठा बनवायला अगदी सोपा आहे व झटपट होणारा आहे. पनीर पराठा सारण बनवताना पनीर कीसून कांदा किसून हिरवी मीरची व कोथबीर घातली आहे. अश्या प्रकारचा पराठा मुले अगदी आवडीने खातात.
बनवण्यासाठी वेळ: 45 मिनीट
वाढणी: 8 पराठे
साहीत्य:
2 कप गव्हाचे पीठ
250 ग्राम पनीर
2 टे स्पून तेल (कडकडीत)
मीठ चवीने
2 मध्यम आकाराचे कांदे (किसून)
2-3 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
1/4 कप कोथबिर (चिरून)
1/2 टी स्पून मिरे पावडर
तेल अथवा तूप पराठे भाजण्यासाठी
कृती:
गव्हाच्या पिठात मीठ घालून पीठ मळून घ्या. पनीर किसून घ्या. कांदे किसून घेवून हलक्या हातानी दाबून त्यातील पानी काढून टाका. मग किसलेले पनीर, कांदा, हिरवी मिरची, कोथबीर, मिरे पावडर, मीठ घालून चांगले मिक्स करून सारण तयार करून घ्या.
मळलेल्या पीठाचे सम प्रमाणात गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या. दूसरा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या व बाजूला ठेवा. एका पुरीवर थोडे सारण ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून त्याच्या कडा चांगल्या दाबून घ्या. मग हलक्या हातांनी पराठा थोडा लाटून घ्या.
तवा गरम करून तेलावर किवा तुपावर पनीर पराठा छान खमंग भाजून घ्या.
गरम गरम पनीर पराठा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.