100% परफेक्ट खमंग चकलीची भाजणी कशी बनवायची दिवाळी फराळ साठी
100% Perfect Khamang Chakli Bhajni For Diwali
दिवाळी जवळ आली की महिलांची फराळाची तयारी सुरू होते. मग चकलीची भाजणी बनवायची, करंजीची तयारी, लाडूची तयारी करायची. मग आपण यूट्यूबवर किंवा चकलीची भाजणी कशी बनवायची ते शोधू लागतो.
फराळामध्ये चकलीची हवीच. आपण फराळ करताना सर्व प्रथम चकलीच हातात घेतो. चकली मस्त झाली की आपल्याला खूप आनंद सुद्धा होतो.
खमंग चकलीची भाजणी बनवताना रेशनचा तांदूळ वापरला आहे. तसेच त्यामध्ये चनाडाळ, उडीदडाळ,मुगडाळ, साबूदाणा, पोहे व फुटाणाडाळ वापरली आहे. त्याच बरोबर धने-जिरे वापरले आहेत. त्यामुळे चकली छान खमंग होते. तसेच हलकी व टेस्टि लागते.
बनवण्यासाठी वेळ: 25-30 मिनिट
वाढणी: दीड किलो बनते
साहित्य:
4 कप तांदूळ (राशनचे)
2 कप चनाडाळ
1 कप मुगडाळ
1/2 कप उडीदडाळ (थोडी कमी)
1/2 कप साबूदाणा
1 कप जाड पोहे
1 कप भाजकी डाळ
1 कप धने
1/2 कप जिरे
कृती: प्रथम तांदूळ, डाळी स्वच्छ निवडून घ्या. मग तांदूळ 2-3 वेळा पाण्यानी स्वच्छ धुवून घेऊन सर्व पाणी काढून मग एका स्वच्छ कापडावर पसरवून 2 दिवस सावलीत घरात सुकू द्या.
मग चनाडाळ, उडीदडाळ, मुगडाळ, साबूदाणा ओल्या कापडानी फक्त पुसून घ्या.
जाड बुडाची कढई गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये तांदूळ मंद विस्तवावर भाजून घ्या. तांदूळ भाजताना विस्तव मंद ठेवा. साधारण पणे तांदूळ भाजायला 7-8 मिनिट लागतील. मग ते एका कापडावर काढून घ्या.
मग चनाडाळ ओल्या कापडानी पुसून घ्या, म्हणजे त्यावर पावडर असेलतर निघून जाईल. मग कढई मध्ये चनाडाळ मंद विस्तवावर 5-7 मिनिट भाजून घ्या. डाळ भाजून झालीकी प्रथम ती नरम लागेल मग कडक होईल.
मग उडीदडाळ, मुगडाळ ओल्या कापडानी पुसून घ्या, म्हणजे त्यावर पावडर असेलतर निघून जाईल.मग त्यासुद्धा मंद विस्तवावर 4-5 मिनिट भाजून घ्या, भाजल्यावर कापडावर काढून घ्या.
आता साबूदाणा सुद्धा मंद विस्तवावर 2-3 मिनिट भाजून घ्या. पोहे भाजताना फक्त 1-2 मिनिट भाजा कारण की पोहे नाजुक असतात नाहीतर करपून जातील. भाजकी डाळ फक्त 1 मिनिट भाजा कारण की ती अगोदरच भाजलेली असते.
मग धने-जिरे 1-2 मिनिट भाजून घ्या. आता सर्व साहित्य भाजून झालेकी थंड झाल्यावर मिक्स करा.
चकलीची भाजणी गिरणीतून दळून आणताना तांदळावर किंवा चनाडाळ वर दळून आणा. ज्वारीवर दळून आणू नका नाहीतर चकल्या बिघडतील.
चकलीची भाजणी दळून आणल्यावर थंड होऊ द्या मग घट्ट झकणाच्या डब्यात भरून ठेवा पाहिजे तेव्हा पाहिजे तेव्हडी काढून घ्या.