10 मिनिटांत घरगुती मसाला आवळा-ओली हळद लोणचे बिना तेलाचे
Homemade Masala Avala-Oli Halad Lonche Bina Telache
आता थंडीच्या दिवसांत आवळे व ओली हळद आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होते. आवळे व ओली हळद आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
आवळ्याच्या सेवनाने आपली पचनशक्ती वाढून पचनाच्या समस्या कमी होतात. त्यामध्ये विटामीन सी भरपूर आहे त्यामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते, रक्तातील साखर पातळी यौग राहते, सांधेदुखी पासून सुटका होते, हृदया संबंधित समस्या दूर होतात.
घरगुती मसाला आवळा-ओली हळद लोणचे बिना तेलाचे ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: आवळा-ओली हळद लोणचे बिना तेलाचे
ओली हळद सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. हिवाळा चालू झालकी बाजारात ओली हळद मिळते. ओली हळद सेवन केल्याने सूज कमी होते, सर्दीच्या समस्या दूर होतात, पचनशक्ति सुधारते, रक्त शुद्ध होते, कॅन्सर होण्या पासून बचाव होतो.
आज आपण अगदी 10 मिनिटांत झटपट आवळा व ओली हळद वापरुन घरगुती मसाला बनवून लोणचे बनवणार आहोत. तसेच आपण ह्यामध्ये तेल आजिबात वापरणार नाही. हे लोणचे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा काढून सेवन करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 250 ग्राम बनते
साहित्य:
2 मोठे आवळे
2 ओली ताजी हळकुंड
मसाला करिता:
4 टे स्पून किंवा 1/2 कप मोहरीची डाळ
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून मेथी दाणे
1/4 टी स्पून हिंग
1 मोठे लिंबू रस काढून
2 टी स्पून साखर
मीठ चवीने
कृती: प्रथम ओली हळद धुवून पुसून घ्या. मग आवळे धुवून पुसून कोरडे करून घ्या. आता आवळे व ओली हळद किसून घ्या.
लोणचे मसाला बनवण्यासाठी प्रथम मोहरीची डाळ 1 मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या, मेथी दाणे सुद्धा थोडेसे गरम करून घ्या. मग मिक्सरच्या जार मध्ये मोहरीची डाळ, मेथी दाणे, लाल मिरची पावडर, हळद, साखर, मीठ थोडेसे ग्राइंड करून घ्या. पण खूप बारीक करायचे नाही. थोडे जाडसरच वाटायचे.
एका बाउलमध्ये कीसलेले आवळे व हळद घेऊन त्यामध्ये लोणचे मसाला घालून वरतून लिंबूरस घालून मिक्स करून घ्या. सर्व मिक्स करून झाल्यावर जर मिश्रण कोरडे वाटले तर अजून थोडे लिंबू पिळा.
आता सर्व मिश्रण एक सारखे मिक्स करून 2 तास तसेच झाकून ठेवा म्हणजे छान मुरेल. मग काचेच्या बरणीत भरून फ्रीजमद्धे ठेवा लागेल तसे काढून परत बाटली फ्रीजमध्ये ठेवा.