हेल्दी कुरकुरीत खुसखुशीत कोथिंबीर वडी बिना बेसन-तांदळाचे पीठ अगदी निराळी पद्धत
Healthy Crispy Different Kothimbir Vadi Bina Besan-Tandalache Pith Recipe In Marathi
कोथिंबीर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न,पोट्याशीयम व विटामीन आहेत. कोथिंबीरचे सेवन करणे पोटाच्या समस्यासाठी फायदेशीर आहे. पचनशक्ति वाढते, अशक्तपणा दूर होतो.
खुसखुशीत कोथिंबीर वडी बिना बेसन-तांदळाचे पीठ अगदी निराळी पद्धत ह्याची विडियो लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता. कोथिंबीर वडी
कोथिंबीर वडी आपण साइड डिश म्हणून बनवू शकतो, कोथिंबीर वडी टेस्टि, खमंग व कुरकुरीत लागते. आपण नेहमी वडी बनवताना बेसन वापरतो पण आज आपण अगदी निराळ्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवणार आहोत. आपण थालीपीठ भाजणी बनवतो व त्याचे थालीपीठ बनवतो पण तीच थालीपीठ भाजणी वापरुन आपण कोथिंबीर वडी बनवली तर खूप टेस्टि लागते.
थालीपीठ भाजणी ही खूप हेल्दी आहे. जर आपल्याकडे थालीपीठ भाजणी नाही तर थोडे ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, बेसन व तांदळाचे पीठ वापरू शकता.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 1/2 कप कोथिंबीर (चिरून)
1 कप थालीपीठ भाजणी पीठ
1 टे स्पून आल-लुसण-हिरवी मिरची पेस्ट
2 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हिंग
1/2 टी स्पून हळद
1 टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
1 टे स्पून तीळ
तेल कोथिंबीर वडी तळण्यासाठी
कृती: प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घ्या, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करून घ्या.
एका मोठया आकाराच्या बाउलमध्ये चिरलेली कोथिंबीर, थालीपीठ भाजणी पीठ, आल-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, मीठ चवीने घालून मिक्स करून मग त्यामध्ये तीळ घालून मिक्स करून घ्या. जर मिश्रण खूपच कोरडे वाटले तर त्यावर पाण्याचा थोडा हबका मारा.
आता मिश्रण चांगले एकजीव करून त्याच्या दोन वळकुट्या बनवा व एक प्लेटमध्ये ठेवा.
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून घ्या, त्यामध्ये एक चाकी ठेवा त्यावर वड्याची प्लेट ठेवून भांड्यावर झाकण ठेवा. झाकण ठेवल्यावर विस्तव मिडियम ठेवून 15 मिनिट स्टीम द्या. 15 मिनिट झाल्यावर झाकण काढून प्लेट बाहेर काढून थंड करायला ठेवा.
कोथिंबीरच्या वड्या पूर्ण थंड झाल्यावर सुरीने कापून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा त्यावर तेल घालून वड्या मांडून घ्या. प्रथम विस्तव मिडियम ठेवा मग बारीक करून तेलावर वड्या छान कुरकुरीत होई पर्यन्त भाजून घ्या. आपल्याला पाहिजे तर आपण ह्या वड्या तेलात सुद्धा तळून घेऊ शकता पण मी नेहमी शालोफ्राय करते.
आता गरम गरम कोथिंबीर वड्या सर्व्ह करा.