10 मिनिटांत स्वादिष्ट कॅरट डिलाईट
In 10 Minutes Delicious Carrot Delight Recipe In Marathi
आता हिवाळा चालू झाला की आपल्याला लाल चुटुक ताजी गाजर बघायला मिळतात. मग आपण गाजराचा हलवा, गाजराची खीर किंवा गाजराचा केक बनवतो. पण आपण कॅरट डिलाईट बनवले आहे का? बनवून पहा खूप मस्त लागते तसेच दिसायला आकर्षक दिसते. आपल्या कडे कोणी पाहुणे येणार असतील तर कॅरट डिलाईट बनवा डेझर्ट म्हणून सर्वाना आवडेल.
10 मिनिटांत स्वादिष्ट कॅरट डिलाईट ह्याच्या विडियोकी लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: कॅरट डिलाईट
गाजर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. गाजर सेवणाने बरेच फायदे होतात. गाजर सेवनाने पचनशक्ती सुधारते. त्यामध्ये बिटा कॅरेटिन आहे ते कॅन्सर होण्यापासून बचाव करते.
गाजर नेहमी कच्चे सेवन केल्याने जास्त फायदे होतात. त्यामुळे वजन वाढत नाही. गाजरच्या पानांमध्ये लोह जास्त असते. त्यामुळे अॅनिमिया दूर होण्यास मदत होते.
थंडीत गाजरचे सेवन करावे. त्यामुळे शरीरात ऊब येते. गाजराचा रस घेतल्याने रोगप्रतिकार शक्ति वाढते. गाजरात जीवनसत्व अ आहे, त्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते.
कॅरट डिलाईट बनवण्यासाठी गाजरचे तुकडे करून ते उकडून घ्यायचे व त्यापासून ही डेझर्ट बनवायचे आहे.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
4 ताजी लाल चुटुक मध्यम आकाराची गाजर
1 1/2 टे स्पून कॉर्नफ्लोर
3 टे स्पून पिठीसाखर
2 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 कप डेसिकेटेड कोकनट
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती: प्रथम गाजर स्वच्छ धुवून, पुसून त्याच्या गोल गोल चकत्या कापून घ्या. मग एका पॅन मध्ये 1 1/2 पाणी घेवून त्यामध्ये गाजराच्या चकत्या घाला झाकण ठेवून मंद विस्तवावर 5-7 मिनिट गाजर शिजवून घ्या. मग एका भांड्यावर चाळणी ठेवून त्यावर गाजराचे तुकडे ओता त्यातील पाणी चाळणीच्या खालच्या भांड्यात येईल ते पाणी टाकून द्यायचे नाही ते पाणी बाजूला ठेवा. गाजर थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.
एका पॅन मध्ये 2 टे स्पून तूप गरम करून त्यामध्ये गाजराचे मिश्रण घालून मंद विस्तवावर 4-5 मिनिट परतून घ्या. एक बाउल घेवून त्यामध्ये बाजूला काढून ठेवलेले गाजराचे पाणी घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर मिक्स करून घ्या.
आता पॅन मधील गाजराच्या मिश्रणात पिठीसाखर व वेलची पावडर घालून मिक्स करून त्यामध्ये कॉर्नफ्लोरचे मिश्रण घालून मिक्स करून 2-3 मिनिट गरम करून घ्या. मिश्रण लगेच हळू हळू घट्ट व्हायला लागेल, मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करा.
मग 3 एक सारखे काचेचे ग्लास घेवून त्याला आतून थोडेसे तूप लावून घ्या. मग गाजराचे मिश्रण ग्लासमध्ये ओता एकसारखे करून घ्या, मग 2 तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
आता एका बाऊलमध्ये डेसिकेटेड कोकनट घ्या. काचेच्या ग्लास प्लेटमध्ये हळुवार पणे उलटा करून घ्या. मग गाजराचे घट्ट झालेले मिश्रण डेसिकेटेड कोकनटमध्ये घोळून घेऊन एका प्लेट मध्ये काढून ठेवा त्याच्या वर ड्रायफ्रूटने सजवून थंड करून सर्व्ह करा.