Healthy Corn Beetroot Rice Poulav For Kids Tiffin Recipe In Marathi
हेल्दी झटपट स्वीटकॉर्न बीटरूट पुलाव राईस मुलांच्या डब्यासाठी आवडीने खातील व मुलांचा डब्बा मिनिटात संपेल
मुलांची शाळा सुरू झाली की सारखा प्रश्न पडतो छोट्या सुट्टीसाठी कोणता डब्बा द्यायचा व मोठ्या सुट्टीसाठी कोणता डब्बा द्यायचा. आपल्याला नेहमी वाटत असते की मुलांना अगदी हेल्दी डब्बा द्यावा व त्यांनी तो संपूर्ण संपवावा.
आज आपण अशीच एक मस्त हेल्दी रेसीपी बनवणार आहोत तेपण अगदी झटपट व मुले सुद्धा आवडीने खातील मुले काय मोठे सुद्धा आवडीने खातील. तसेच आपली ही डिश आकर्षक सुद्धा दिसते. आपण इतर वेळी किंवा पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो नक्की सर्वाना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 1 जणसाठी
साहित्य:
1 कप शिजवलेला भात
1/4 कप स्वीट कॉर्न (वाफवून)
1/4 कप बीटरूट (वाफवून किसून)
1 छोटासा कांदा (उभा पातळ चिरून)
2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून)
7-8 काजू
1 टे स्पून तेल
1 टे स्पून तूप
मीठ चवीने
कृती: तांदूळ धुवून भात शिजवून घ्या, किंवा आपल्या कडे भात राहिला असेलतर तो वापरला तरी चालेल. स्वीटकॉर्न व बीटरूट अर्धवट वाफवून घ्या, मग बीटरूट किसून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या. हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्या.
एका कढई मध्ये तेल व तूप गरम करायला ठेवा. मग त्यामध्ये चिरलेला कांदा घालून एक मिनिट परतून चिरलेल्या मिरच्या व काजू घालून परत एक मिनिट परतून घ्या.
आता त्यामध्ये वाफवलेले स्वीटकॉर्न घालून मिक्स करून मग बीटरूट घालून एक मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये मीठ घालून मिक्स करा.
मग त्यामध्ये शिजवलेला भात घालून मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्या.
गरम गरम स्वीटकॉर्न बीटरूट पुलाव सर्व्ह करा.