बेंगलोर स्टाइल इन्स्टंट रवा इडली विथ पुदिना चटणी एकदा खाल नेहमी अशीच इडली कराल
Bangalore Style Instant Rava Idli With Pudina Chutney Recipe In Marathi
इडली हा पदार्थ लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ति पर्यन्त आवडतो. इडली ही पचायला हलकी असते व आरोग्यदायी सुद्धा आहे. इडली हा पदार्थ दक्षिण भागातील लोकप्रिय पदार्थ असला तरी संपूर्ण भारतभर बनवली जाते.
The Bangalore Style Instant Rava Idli With Pudina Chutney Recipe In Marathi can be seen on our You tube Chanel Instant Rava Idli With Pudina Chutney
आज आपण इडलीचा एक मस्त प्रकार बनवणार आहोत तो सुद्धा झटपट. आज आपण रवा वापरुन इडली बनवणार आहोत त्याबरोबर चटणी सुद्धा बनवणार आहोत. चटणी आपण पुदिना वापरुन बनवणार आहोत.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाफवण्यासाठी वेळ: १२-१५ मिनिट
वाढणी: १२ इडली
इन्स्टंट इडली साहित्य:
१ कप रवा
१ कप दही
१/२ टी स्पून खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा किंवा इनो
मीठ चवीने
१ टी स्पून तूप
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून चनाडाळ
१/२ टी स्पून उडीद डाळ
५-६ काजू
१ हिरवी मिरची
७-८ कडीपत्ता पाने
१/२” आल
२ टे स्पून कोथिंबीर
पुदिना चटणी साहित्य:
१ वाटी ओला नारळ
१/४ वाटी कोथिंबीर
१/४ वाटी पुदिना पाने
१ टे स्पून फुटाणा डाळ
२-३ हिरव्या मिरच्या
४-५ लसूण पाकळ्या
१/२ वाटी दही
मीठ चवीने
फोडणीकरिता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
७-८ कडीपत्ता पाने
२ लाल सुक्या मिरच्या
पुदिना चटणी कृती: ओला नारळ किसून घ्या, कोथिंबीर व पुदिना धुवून चिरून घ्या, लसूण सोलून घ्या. मिक्सरच्या जारमध्ये ओला नारळ, कोथिंबीर, पुदिना, लसूण, हिरवी मिरची, मीठ व दही घालून ब्लेंड करून घ्या.
फोडणीच्या वाटी मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कडीपत्ता व लाल मिरची घालून फोडणी चटणीवर टाका. आता आपली चटणी तयार झाली.
इन्स्टंट रवा इडली कृती: रवा, दही, १/२ वाटी पाणी व मीठ घालून मिक्स करून झाकण ठेवून इडलीचे बॅटर १५ मिनिट झाकून ठेवा. म्हणजे रवा छान भिजेल. इडली स्टँडला तेल लावून घ्या.
प्रथम कोथिंबीर, हिरवी मिरची धुवून चिरून घ्या, आले धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.
एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मोहरी, चणाडाळ, उडीद डाळ, काजू, आले, हिरवी मिरची, कडीपात पाने, व कोथिंबीर घालून १ मिनिट परतून घ्या.
आता रवा चांगला भिजला असेल त्यामध्ये तुपामध्ये परतून घेतलेले मिश्रण घालून मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा इनो घालून त्यावर १ चमचा पाणी घालून हळुवार पणे मिक्स करून घ्या.
इडलीच्या भांड्यात पाणी घालून गरम करायला ठेवा. इडलीचे मिश्रण इडली स्टँडमध्ये घालून इडली १२-१५ मिनिट वाफवून घ्या. इडली वाफवून झाल्यावर विस्तव बंद करून इडली थोडी थंड झाल्यावर चटणी बरोबर सर्व्ह करा.