वडा भात : वडा भात हा चवीला अगदी वेगळा पण छान लागतो. ह्यामध्ये डाळीचे वडे करून घातल्यामुळे खमंग लागतो. व दिसायला पण छान दिसतो. आपण नेहमी मसाले भात, भाज्या वापरून पुलाव बनवतो. ह्या प्रकारचा भात बनवून पहा जरूर आवडेल.
साहित्य : २ कप तांदूळ, १ कप तुरडाळ, १/२ कप उडीद डाळ, १ कप हरबरा डाळ, १ टी स्पून जिरे, २-३ दालचीनी तुकडे, तळण्यासाठी तेल
मसाला (वाटणे) : १/२ टे स्पून जिरे, ५-६ मेथी दाणे, १ टेस्पून धने, १/४ टीस्पून हिंग, १” आले (तुकडा), २ हिरव्या मिरच्या
फोडणी : १ टे स्पून तेल, १/४ टीस्पून हळद, १/४ टीस्पून हिंग, १ टीस्पून लाल मिरची पावडर, कोथंबीर, ७-८ कडीपत्ता पाने, मीठ चवीने
कृती : रात्री सर्व डाळी वेगवेळ्या भिजत घालाव्यात. धने व जिरे पण थोड्या पाण्यात भिजत घालावे.
मिरच्यांचे तुकडे, जिरे, मेथी दाणे, धने, आले वाटून घ्यावे. कडीपत्ता, कोथंबीर बारीक चिरून घ्यावी.
तांदूळ धुवून बाजूला ठेवा. सर्व डाळी जाडसर वाटून घ्याव्यात व त्यामध्ये वाटलेला मसाला, फोडणी घालून मिक्स करावे व त्याचे छोटे-छोटे गोळे करून गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.
एका जाड बुडाच्या भांड्यात एक टे स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे, दालचीनी, तांदूळ घालून परतून घ्या. चार वाट्या गरम पाणी घालून भात शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये तळलेल्या वड्याचे तुकडे करून घाला व मिक्स करा. काकडीच्या किंवा टोमाटो रायत्या बरोबर सर्व्ह करा.