सातकप्पे घावन Saat Kappe Ghavan – सातकापे घावन हा पदार्थ महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात प्रसिद्ध आहे. ही डिश सणाला बनवली जाते. आता सातकप्पे म्हणजे काय तर सात वेळा एका वर एक लेअर देणे. ही डिश तांदळाचे डोसे व ओल्या नारळाच्या खोबऱ्या पासून बनवली आहे. सातकप्पे घावन हे तांदळाच्या डोश्या मुळे छान कुरकुरीत व नारळा मुळे मधुर लागते. ही एक वेगळीच डिश आहे.
साहीत्य
४ कप तांदळाचे पीठ (आंबेमोहर)
मीठ चवीनुसार
सारणा साठी
२ कप नारळ (खोवलेला)
३/४ कप गुळ
१ टी स्पून वेलचीपूड
तेल
कृती
नारळ व गुळ थोडा गरम करून त्यात वेलची पावडर टाकावी व सारण करून घ्यावे. (जसे आपण मोदक करण्यासाठी करतो तसे.)
तांदूळ धुऊन सावलीमध्ये वाळवून दळून आणावे. चाळून त्यामध्ये पाणी घालून पातळ सारखे भिजवावे. (जसे आपण घावन साठी भिजवतो तसे) विस्तवावर बिडाचा तवा (किंवा नॉनस्टिक ) ठेवुन तापवून त्याला तेल लावावे व त्यावर घावन घालून झाकण ठेवावे. नंतर झाकण काढून घावन उलटवावे व अर्ध्या भागावर १ टेबल स्पून सारण पसरवून व दुसरा भाग त्यावर पसरवावा. नंतर उरलेल्या रिकाम्या जागेवर पीठ घालून जरावेळाने सारण घालावे व पहिला भाग त्यावर परतावा. असे पाच-सहा वेळा करावे मग घावन खाली काढावा. थंड झाल्यावर त्याचे आडवे तुकडे करून तुपाबरोबर खाण्यास द्यावे.