शाही नारळाचे उकडीचे मोदक: गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी आली की आपल्याला गणपती बाप्पाना प्रसाद म्हणून त्याचे आवडतीचे नारळाचे मोदक करायची घाई असते. हेच मोदक आपण व्यवस्थित मापाने बनवले तर लवकर व छान होतात. मोदक ही स्वीट डीश आहे. महाराष्ट्रातील मराठी लोकांची पारंपारिक आवडती डीश आहे. मराठी गृहिणी ती श्रद्धेने बनवत असतात. नारळाचे मोदक हे चवीस्ट लागतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २१ मोदक
साहित्य : सारणासाठी
२ मध्यम आकाराचे नारळ (खोवून)
१ १/२ कप गुळ व १/२ कप साखर
१ टी स्पून वेलची पावडर
१/२ कप सुकामेवा (काजू, बदाम (तुकडे करून) किसमीस)
आवरणासाठी :
२ कप तांदळाचे पीठ
२ टे स्पून मैदा
२ टे स्पून तेल
मीठ चवीने
कृती : सारणासाठी : नारळ खोवून त्यामध्ये साखर, गुळ, मीठ मिक्स करून सारण मंद विस्तवावर सारण थोडी घट्ट होईपरंत शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये काजू बदाम तुकडे, वेलचीपूड व किसमिस घालून ममिश्रण बनवून घ्या.
आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात २ कप पाणी व २ टे स्पून तेल मिक्स करून गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मीठ मग तांदळाचे पीठ व मैदा घालून मिक्स करून भांड्यावर झाकण ठेवा व २-३ मिनिट शिजू द्यावे व विस्तव बंद करावा. नंतर शिजवलेले तांदळाचे पीठ परातीत काढून घ्यावे व चांगले मळून घ्यावे. मळल्या वर पीठाचे मोठ्या लिंबा एव्ह्डे २१ गोळे करून घ्या.
मोदक कसे बनवावेत : एक एक पिठाचा गोळा हातावर घेवून हातावरच पुरी सारखा थापून (पाण्याचा हात घेवून) त्या पुरी मध्ये १ मोठा चमचा सारण भरून पुरी बंद करावी व त्याला हाताने मोदकाचा आकार द्यावा किंवा मोदक साचा मध्ये मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व्ह मोदक तयार करून घ्यावेत.
मोदकाला उकड कशी द्यायची : एका मोदक पात्रामध्ये दोन मोठे ग्लास पाणी घेवून गरम करायला ठेवा. मोदक पात्राच्या प्लेटवर केळीचे पान ठेवून पानावर थोडे पाणी शिंपून त्यावर मोदक व्यवस्थित ठेवावे परत मोदकावर अजून एक केळीचे पान ठेवावे त्यावर मोदक पात्राचे झाकण घट्ट लावावे व १५ मिनिटे मोदकाला उकड द्यावी.
गरम गरम सर्व्ह करावे. सर्व्ह करतांना वरतून साजूक तूप घालावे.
टीप : तांदळाचे पीठ सुवासिक तांदळाचे घ्यावे. पीठ फार जुने नसावे.
सारण फार कोरडे करू नये. मोदक हाताने करायला जमले नाहीतर साचामध्ये बनवावेत. मोदक पात्र नसेल तर मोठ्या भांड्यावर चाळणी ठेवून मोदकाला उकड आणावी.
कीळीचे पान नसेल तर सरळ बटर पेपर वापरावा किंवा मलमलचे कापड ओले करून मग त्यावर मोदक उकडायला ठेवावे. व मोदक काढतांना ओल्या हातांनी काढावे.