चॉकलेट रसमलाई : आपण नेहमीच रसमलाई बनवतो किंवा आणतो. खर म्हणजे रसमलाई हा पदार्थ बंगाली आहे. पण मी त्याचा एक वेगळा प्रकार बनवला आहे. त्यामध्ये चॉकलेटची टेस्ट दिली आहे. त्यामुळे ही रसमलाई खूप छान व वेगळी लागते. चॉकलेट हे सर्वाना आवडते त्यामुळे ही रसमलाई नक्की आवडेल. तसेच बाहेर बंगाली मिठाई खूप महाग आहे. तीच आपण घरी बनवली तर चांगलीच बनते. चॉकलेट रसमलाई आपण पार्टीला किंवा सणाच्या दिवशी सुद्धा बनवू शकतो.
चॉकलेट रसमलाई बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य : रसगुल्ले बनवण्यासाठी
१ लिटर ताजे दुध (गाईचे)
१/८ स्पून सायट्रिक ऍसिड (१ टे स्पून पाण्यामध्ये विरघळवून)
एक चिमुट बेकिंग पावडर
कॅडबरी चॉकलेटचे थोडे तुकडे
रसमलाईचे दुध बनवण्यासाठी
१ लिटर दुध (म्हशीचे)
२ टे स्पून दुध पावडर
३ टे स्पून साखर
१/२ टी स्पून वेलचीपूड
सुकामेवा तुकडे सजावटीसाठी
चॉकलेट सॉस सजावटीसाठी
कृती : रसगुल्ले बनवण्यासाठी : दुध गरम करून त्यामध्ये सायट्रिक ऍसिडचे पाणी मिक्स करून चांगले मिक्स करा मग दुध नासले की मंद विस्तवावर १-२ मिनिट हालवत रहा. एक मलमलचे कापड चाळणीवर ठेवून नासलेले दुध त्यावर ओता आणि त्यातील जास्तीचे पाणी काढून त्यावर थंड पाणी ओता ते पण पाणी दाबून काढा पण अगदी कोरडे करू नका. ह्यालाच छाना म्हणतात.
नंतर छाना मध्ये बेकिंग पावडर घालून मिक्सरमध्ये फक्त एकदा फिरवा व प्लेटमध्ये काढून घेवून त्या छान्याचे लहान-लहान गोळे बनवून प्रत्येक गोळयामध्ये एक-एक चॉकलेटचा तुकडा वघालून परत गोळा बंद करा, असे सर्व गोळे बनवून घ्या.
एका भांड्यात ४ -५ पेले पाणी घेवून त्यामध्ये २ टे स्पून साखर घालून पाणी उकळल्यावर त्यामध्ये बनवलेले गोळे घालून भांड्यावर झाकण ठेवा व ८-१० मिनिटे गोळे शिजवून घ्या व थंड करायला ठेवा.
रसमलाईचे दुध बनवण्यासाठी : दुध गरम करून साखर घालून दुध १०-१५ मिनिट उकळून त्यामध्ये दुध पावडर घालून मिक्स करून परत पाच-सात मिनिट दुध उकळून घ्या. नंतर त्यामध्ये वेलचीपूड घालून दुध थंड करायला ठेवा. दुध थंड झाल्यावर हलक्या हाताने रसगुल्ले काढून दुधामध्ये घाला. मग वरतून चॉकलेट सॉस व सुकामेवा तुकडे घालून सुशोभित करा.
The English language version of the Homemade Chocolate Rasmalai recipe is published in the article – Here