स्वीट कॉर्न -मक्याचे दाने- पोहे कबाब, Sweet Corn-Makayache Dane-Pohe Kebab : कॉर्न पोहे कबाब हे संध्याकाळी चहा बरोबर किंवा साईड डीश म्हणून पण करता येतात. ह्या कबाब मध्ये आवरण हे पोह्याचे बनवले आहे व त्यावर कॉर्न फ्लॉस चुरा लावला आहे त्यामुळे हे कबाब छान कुरकुरीत होतात. लहान मुलांना हे कबाब फार आवडतील.
साहित्य :
सारणा साठी :
२ कप स्वीट कॉर्न दाणे
१ टे स्पून बटर,
२ हिरवी मिरची
१ टी स्पून लिंबू रस
२ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
पारीसाठी :
२ कप पातळ पोहे
१/२ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
आवरणा साठी :
२ टे स्पून मैदा
मीठ
१ कप कॉर्न फ्लॉक्स चुरा
तळण्यासाठी तेल
कृती :
स्वीट कॉर्नचे दाणे ओव्हनमध्ये २ मिनिट उकडून घ्यावे. एका कढईमध्ये बटर गरम करून त्यामध्ये हिरवी मिरचीचे बारीक तुकडे घालून मीठ घालून उकडलेले स्वीट कॉर्न दाणे घालावे व वरतून लिंबू रस व कोथंबीर घालून मिक्स करून २-३ मिनिट फ्राय करून घ्यावे.
पोह्या एकदा मिक्सरमध्ये काढून घावे व त्यामध्ये मीठ, मिरे पावडर घालून थोडे-थोडे पाणी घालून चांगले मळून घ्यावे, मग त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्या. मग एक एक गोळा घेवून हातावर थापून त्यामध्ये एक चमचा सारण भरून त्याला पाहिजे तो आकार द्यावा.
आवरणासाठी : मैदा, मीठ व पाणी मिक्स करून त्याची पातळ सारखी पेस्ट करून घ्या. कॉर्न फ्लॉक्स चुरा एका प्लेट मध्ये घ्यावा.
कढई मध्ये तेल गरम करून एक एक मोदक घेवून मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून मग कॉर्न फ्लॉक्सच्या चुऱ्यामध्ये घोळून मग तेलामध्ये गुलाबी रंगावर तळून घ्यावा.