शाही पुरण पोळी : पुरण पोळी ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वीट डीश म्हणजेच पक्वान्न आहे. मराठी लोक होळी, श्रावण महिना, गणपती गौरीच्या नेवेद्याला किंवा सणावाराला सुद्धा अगदी आवर्जून करतात. पुरणपोळीमध्ये मी खवा, काजू-बदामची पावडर, गूळ व साखर, वेलचीपूड व जायफळ वापरले आहे त्यामुळे ती शाही पुरण पोळी झाली आहे. पुरण पोळी म्हंटले की त्याबरोबर कटाची आमटी पाहिजेच. गोड पुरणपोळी बरोबर आंबट-गोड कटाची आमटी सुंदरच लागते. गौरी पुजीच्या दिवशी ही शाही पुरण पोळी नेवेद्य म्हणून करा.
शाही पुरण पोळी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १३ पोळ्या बनतात
साहित्य : पुरणा साठी
२ कप हरबरा डाळ
२ कप गुळ
१/४ कप साखर
१/२ कप खवा
२ टे स्पून काजू-बदाम पावडर
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पूड
मीठ चवीने (आवडत असेल तर)
पोळी साठी
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून मैदा
२ टे स्पून तेल
मीठ चवीने
पोळी लाटायला तांदळाची पिठी
कृती
हरबरा डाळ निवडून, स्वच्छ धुवून १५-२० मिनिट भिजत ठेवावी म्हणजे चांगली शिजते. मग कुकुर मध्ये डाळ शिजवायची असेल तर २ कप डाळीला ५ कप पाणी घाला. (पाणी थोडे जास्त घातले की आपल्याला डाळीचा कट आमटी करायला काढता येतो.) पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून ४-५ शिट्या काढाव्यात मग मंद विस्तवावर ५ मिनिट डाळ शिजू द्यावी. कुकर उघडल्यावर डाळ चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्या त्यालाच कट म्हणतात. कट काढल्यामुळे पुरण पोळी हलकी होते. कट काढून शिजलेली डाळ परत कुकरमध्ये घालून गुळ, साखर घालून चांगले घोटावे. गुळ, साखर घातल्यावर ते पातळ होईल मग ते घट्ट होत जातील घट्ट व्हायला लागल्यावर खवा, वेलचीपूड, जायफळाची पूड, काज-बदाम पूड घालून मिक्स करावे. पुरण चांगले घट्ट शिजवावे म्हणजे झारा मध्ये उभा राहील पडणार नाही. मग गरम-गरम पुरण पुरण यंत्रातून वाटून घ्यावे.
गव्हाचे पीठ, मैदा चाळून घ्यावे व त्यामध्ये मीठ व तेल मिक्स करून दुध व पाणी मिक्स करून कणिक सैलसर मळावी व १ १/२ ते २ तास तशीच बाजूला ठेवावी. मग तेलाचा वापर करून परत चांगली मळून घ्यावी. कणिक जेव्हडी जास्त मळली जाईल तेव्हडी पोळी सुंदर होईल. पीठाचे छोटे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या व पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण घेवून लाटलेल्या पुरीवर ठेवा व पुरी बंद करून लाटून घ्या. पोळी तांदळाच्या पिठीवर लाटून घ्या. म्हणजे पोलपाटाला चीटकणार नाही. मग पोळी मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. गरम-गरम पोळी साजूक तूप घालून सर्व्ह करावी.
टिप :
हरबरा डाळ निवडून डोळ काढून घ्या. पुरण अगदी चांगले शिजले पाहिजे. जर डाळ पूर्ण शिजली नाहीतर गुळ घातल्यावर डाळ कडक होते.
पुरणामध्ये खवा घातल्यामुळे पोळीची चव फार सुंदर लागते. तसेच साखरे मुळे सुद्धा पोळीला चांगली चव येते.
पुरण जर सैल झालेतर मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवावे म्हणजे कोरडे होईल.
The Recipe for Katachi Amti is published in this – Article
The video of this Puranpoli recipe in Marathi can be seen on our YouTube Channel – Shahi Maharashtrian Puran Poli