उपवासाची कचोरी : उपवासाची कचोरी ही बटाटा कोथंबीर व नारळ वापरून केली आहे. ही उपवासाची एक वेगळीच रेसिपी आहे. आपण उपवासासाठी नेहमीच साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे. बटाटा भाजी बनवतो. उपवासाची कचोरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. ही उपवासाची कचोरी गरम-गरम खायला चांगली लागते.
उपवासाची कचोरी बनवण्यासाठी वेळ : ५० मिनिट
वाढणी : ५ जणासाठी साधारणपणे १० बनतात
साहित्य :
पारी साठी
४-५ मोठे बटाटे
२ टे स्पून साबुदाणा पीठ
मीठ चवीने
सारणा साठी :
२ कप ओला नारळ खोवून
१/२ कप कोथंबीर
३-४ हिरव्या मिरच्या
१/४ कप काजू
१/४ कप कीस-मिस
१ टे स्पून लिंबू रस
मीठ व साखर चवीने
तळण्यासाठी डालडा तूप किंवा रिफाईड तेल
कृती
सारणा साठी : नारळ खोवून घ्यावा. कोथंबीर धुवून बारीक चिरून घ्यावी. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्यात. काजू थोडे कुटून घ्यावेत. मग खोवलेला नारळ, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, काजू. कीस-मिस, लिंबू रस, मीठ व साखर घालून मिक्स करून सारण बनवून घ्यावे.
पारी साठी : बटाटे उकडून सोलून किसून घ्यावेत. मग त्यामध्ये साबुदाणा पीठ व मीठ मिक्स करून घ्या, मग त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून त्यामध्ये नारळाचे सारण भरून गोळा बंद करा.
कढईमध्ये तूप गरम करून मंद विस्तवावर कचोऱ्या तळून घ्याव्यात.