उपवासाची रश्याची भाजी : उपवासाची रश्याची भाजी ही वऱ्याच्या डोश्या बरोबर छान लागते. ही भाजी नवरात्रीच्या उपवासामध्ये करता येईल. ह्यामध्ये लाल भोपळा, बटाटा, रताळे वापरले आहे. तसेच चिंच-गुळ घातल्याने आंबट-गोड छान चव येते.
उपवासाची रश्याची भाजी बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ कप लाल भोपळ्याचे तुकडे
१ मोठे रताळे
१ मोठा बटाटा
२ टे स्पून कोथंबीर
१ टे स्पून चिंच
गुळ-मीठ चवीने
१ टे स्पून साजूक तूप
रश्यासाठी मसाला
१ कप ओला नारळ (खोवून)
२-३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून जिरे
१ टे स्पून शेगदाणा कुट
कृती :
प्रथम रताळी, बटाटे व लाल भोपळा सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून पाण्यामध्ये घालून ठेवा. मग तुपामध्ये थोडे परतून घेवून बाजूला ठेवा. मसाला वाटून घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला परतून घ्या. मग त्यामध्ये बटाटे, लाल भोपळा, रताळ्याचे तुकडे घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये १/२ कप पाणी घालून कढई वर झाकण ठेवून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजल्यावर चिंच-गुळ, मीठ, शेगदाणे कुट, कोथंबीर घालून एक उकळी आणा. गरम गरम सर्व्ह करा.