शाही ओल्या नारळाच्या करंज्या : ( Shahi Fresh Coconut Karanji) दिवाळी पदार्थामध्ये करंजी ही पाहिजेच त्याशिवाय मज्जा नाही. करंजी हा गोड पदार्थ पूर्वी पासून करत आहेत. त्याकाळी करंजीला “संयावस” म्हणत. कालांतराने तिचे नाव बदलत गेले. महाराष्ट्रात करंजी हे नाव आहे. उत्तरप्रदेश मध्ये “गुजिया” हे नाव आहे. काही ठिकाणी “नेवरी” हे नाव आहे. पठारे प्रभूच्या घरामध्ये “कानवले” म्हणतात. सारस्वतामध्ये “साट्याच्या करंज्या” असे म्हणतात. कर्नाटकात तिला “कडबू” हे नाव पडले. चक्क थायलंड मध्ये तिला “ गरीपाक”असे नाव आहे. सातासमुद्रापार ति गेली तिथे ती ओव्हन मध्ये जाऊन बसली. तेथील लोक ओव्हन मध्ये बनवतात.
करंजी ही बनवायला सोपी आहे. पण ती बनवायला मेहनत लागते त्यासाठी दोघी जणी तरी पाहिजेत. म्हणजे लवकर होतील. एकीने करंजी लाटून बनवून द्यायची व दुसरीने तळायची. एकटीला बनवायला थोडासा जास्त वेळ लागतो. करंज्या दोन प्रकारच्या असतात. एक ताज्या व दुसऱ्या टीकाऊ असतात. ताज्या करंज्या ह्या लगेच संपवाव्या लागतात. टिकावू करंज्या ह्या १०-१५ दिवस राहतात. करंज्या बनवता काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.
करंजीच्या पारीसाठी रवा वापरता येतो. रवा व मैदा वापरता येतो किंवा फक्त मैदा वापरता येतो. पीठ मळताना पाणी किंवा दुध वापरावे पीठ घट्ट मळावे व करंज्या कराव्यात पण रवा वापरला तर पीठ २ तास तरी आधी मळून झाकून ठेवावे. मग त्याच्या लाट्या बनवाव्यात.
करंजीच्या सारणासाठी ओला नारळ वापरावा तसेच सुक्या नारळाच्या करंज्या बनवल्या जातात. पण ओल्या नारळाच्या करंज्याची मज्जा काही निराळीच आहे. त्याला शाही करंज्या सुद्धा म्हणता येतील.
करंजी कशी बनवायची ते मी इथे स्टेप बाय स्टेप दिले आहे.
करंजीचे सारण कसे बनवावे, करंजीची पारी अथवा आवरण कसे बनवावे व नंतर कारंजी कशी बनवावी. करंजी ही तुपात तळलेली छान लागते.
सारण बनवायला वेळ : २ तास
कारंजी बनवायला वेळ : ३ तास
करंज्या बनतात साटा वापरून : ७०
करंजीचे सारण कसे बनवावे.
साहित्य :
२ मध्यम नारळ (खोवून)
१/२ लिटर दुध
२ १/२ ते ३ कप साखर (जशी गोडी पाहिजे तसे)
२ टी स्पून वेलचीपूड
१ टी स्पून जायफळ पूड
१/२ कप काजू-बदाम (भरडून)
१/४ कप चारोळी
कृती : प्रथम नारळ खोवून घ्या. मग मोठ्या आकारच्या कढई मध्ये खोवलेला नारळ व दुध एकत्र करून थोडे आटवून घ्यावे. मग त्यामध्ये साखर घालून थोडे कोरडे होई परंत आटवून घ्यावे. मिश्रण चांगले थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर मिक्सर मधून काढावे. मग त्यामध्ये वेलचीपूड, जायफळ पूड, ड्रायफ्रूट व चारोळी घालून सारण मिक्स करावे म्हणजे हे सारण तयार झाले. सारण नेहमी कारंजी बनवण्याच्या आधल्या दिवशी करून ठेवावे म्हणजे कारंजी बनवायला फार वेळ लागत नाही.
आता आपण बघुया करंजीचे आवरण किंवा पारी कशी बनवावी. ते पण बनवायला फार सोपे आहे.
पारी किंवा आवरणासाठी साहित्य :
१/२ किलोग्राम (५०० ग्राम) ४ कप बारीक रवा
६ टे स्पून तूप (वनस्पती तूप) (अगदी कडकडीत)
१ टी स्पून मीठ
१ १/२ कप पाणी किंवा दुध
१/२ किलो ग्राम तूप (वनस्पती) साधारपणे कारंजी तळायला
कृती : रवा ताजा घ्यावा. बारीक रवा व मीठ परातीत एकत्र करून घेवून त्यामध्ये तुपाचे मोहन घालावे. चांगले मिक्स करावे की मोहन सगळीकडे लागले पाहिजे मग त्यामध्ये पाणी किंवा दुध घालून पीठ मळून घ्यावे पीठ मळताना पाणी अथवा दुध हळूहळू घालावे नाहीतर एकदम पीठ सैल होवून जाईल. पीठ दोन तास झाकून ठेवावे नंतर थोडेसे कुटून किंवा मिक्सरमध्ये काढावे. मग त्याचे एक सारखे लिंबाए एव्ह्डे ७० गोळे करावे.
मग त्याच्या गोल पुरी एव्ह्डी पुरी लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून पुरीला कडेनी थोडेसे दुध लावून पुरी बंद करावी थोडी कडेनी दाबून नक्षीच्या कटरने कापावी अश्या १५-२० करंज्या बनवून ओल्या कापडात करंज्या ठेवाव्यात मग गरम तेलामध्ये गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात.
तळून झाल्याकी एका पेपरवर ठेवाव्यात. थंड झाल्यावर मग घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवाव्यात.