कोथंबीरीचे सारण भरून पराठा: धनिया पराठा किंवा कोथंबीरीचे सारण भरून पराठा हा नाश्त्याला बनवता येतो. कोथंबीर पराठा हा छान खमंग लागतो. कोथंबीर पराठा बनवतांना ह्यामध्ये तीळ, खस-खस, सुके खोबरे, गरम मसाला, वापरला आहे त्यामुळे पराठ्याची चव अगदी अप्रतीम लागते. कोथंबीरचा पराठा हा महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे. बनवायला पण झटपट आहे.
कोथंबीर पराठा बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
आवरणासाठी:
१ १/२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून बेसन
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१ टी स्पून तेल
मीठ चवीने
सारणासाठी:
२ कप कोथंबीर (चिरून)
१ टे स्पून तीळ
१ टे स्पून खस-खस
२ टे स्पून सुके खोबरे (किसून)
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
१ टी स्पून लिंबू रस किंवा आमचूर पावडर
मीठ चवीने
तेल पराठा भाजण्यासाठी
कृती: सारणासाठी : कोथंबीर धुवून, बारीक चिरून १५ मिनिट पेपरवर पसरवून ठेवावी. म्हणजे थोडी कोरडी होईल. मंद विस्तवावर तीळ, खस-खस, सुके खोबरे थोडेसे भाजून घ्या.
मग चिरलेली कोथंबीर, तीळ, खस-खस, सुके खोबरे, आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, लिंबू रस किंवा आमचूर पावडर, मीठ घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या. व त्याचे ४ एक सारखे भाग करा.
आवरणासाठी : गव्हाचे पीठ, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, मीठ व तेल घालून मिक्स करून चांगले पीठ मळून १० मिनिट बाजूला ठेवा. नंतर त्याचे एकसारखे ८ गोळे बनवा (म्हणजे ४ परोठे होतील). एक गोळा घेवून चपाती सारखा लाटून घ्या. मग त्यावर कोथंबीरीच्या सारणाचा एक भाग पसरा, त्यावर दुसरी पोळी लाटून कडेनी कडा दाबून घ्या. मग परोठा थोडासा लाटून घ्या.
तवा गरम करून पराठा दोनीही बाजूनी तेल घालून खमंग भाजून घ्या.
कोथंबीर पराठा गरम-गरम टोमाटो सॉस बरोबर किंवा दह्या बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Coriander Stuffed Paratha is published in this – Article