चीज कोथंबीर वडी: चीज कोथंबीर वडी ही एक टेस्टी वडी आहे. जेवणामध्ये ही एक साईड डीश म्हणून बनवता येते. महाराष्ट्रात कोथंबीर वडी ही खूप लोकप्रिय आहे. कोथंबीरीचा सुगंध खूप छान आहे. त्यामुळे ह्या वड्या खूप छान लागतात. धनिया वड्या बनवतांना त्यामध्ये बडीशेप बारीक करून घालावी व तेल घातल्यामुळे व एक चिमुट सोडा घातल्यामुळे वड्या छान हलक्या होतात. व श्यालो फ्राय केल्याने तेल पण कमी लागते व छान कुरकुरीत होतात. वरतून चीज घातल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते.
वड्या बनवताना कोथंबीरची पाने कवळी घ्यावीत.
कोथंबीर वड्या बनवण्यासाठी लागणारा वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ जुडी कोथंबीर
१ कप बेसन (चना डाळीचे पीठ)
१/२ टे स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद पावडर
१ टी स्पून बडीशेप (पावडर करून)
१ टे स्पून तेल
एक चिमुट खायचा सोडा
मीठ चवीने
एक चीज क्युब (किसून)
तेल कोथंबीर वडी तळण्यासाठी
कृती:
कोथंबीर निवडून, धुवून पेपरवर ५-७ मिनिट पसरवून ठेवा. मग चिरून एका परातीत ठेवा. चिरलेल्या कोथंबीरमध्ये बेसन, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, बडीशेप, गरम तेल, सोडा घालून मिक्स करून घट्ट मळून घ्या व त्याची गोल वळकटी बनवा.
एका भांड्यात किवा कुकर मध्ये पाणी घालून त्यामध्ये एक छोटे भांडे ठेवून त्यावर एक चाळणी ठेवून चाळणी वर कोथंबीरची वळकटी ठेवा. कुकरच्या झाकणाची शिटी काढून कुकरचे झाकण लावा व १०-१२ मिनिट वळकटीला वाफ द्या. थंड झाल्यावर त्याच्या गोल गोल चकत्या कापा.
तवा गरम करून त्यावर तेल लावून चिरलेल्या वड्या पसरवून बाजूनी थोडे-थोडे तेल घाला. मग वड्या उलट्या करून त्यावर चीज किसून घाला. चीज घातल्यावर परत वडी उलट करू नका.
कोथंबीरीच्या वड्या दोनी बाजूनी फ्राय करून झाल्यावर वडीला छान चीजची पण टेस्ट येते. अश्या प्रकारची चीज कोथंबीर वडी खूप सुंदर लागते व वरतून चीज घातल्यामुळे दिसायला पण छान दिसते.