फोडणीची पोळी: फोडणीची पोळी ही सकाळी नाश्त्याला, मुलांना डब्यात देता येते. फोडणीची पोळी ही राहिलेल्या पोळ्याची करता येते. कधी कधी पोळ्या जास्त होतात किंवा रहातात तेव्हा त्या पोळ्या टाकून न देता त्याला फोडणी देता येते किंवा पोळ्याचा लाडू सद्धा बनवता येतो. फोडणीची पोळी ही महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. लहान मुलांना खूप आवडते. फोडणी च्या पोळीमध्ये उकडलेला बटाटा चिरून टाकला किंवा शेगदाणे फोडणीमध्ये घातले तरी छान लागतात किंवा सीझनमध्ये मटार सुद्धा छान लागतात. कोथंबीर व ओला नारळ खोवून घातला तर अजूनच छान लागते.
The English language version of this recipe can be seen here – Phodnichi Poli
फोडणीची पोळी बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
४ चपात्या (पोळ्या)
२ टे स्पून कोथंबीर
२ टे स्पून नारळ (खोवून)
मीठ चवीने
फोडणीसाठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१ छोटा कांदा (चिरून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ छोटा बटाटा
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
कृती:
चपातीचे बारीक तुकडे घेवून त्यामध्ये कोथंबीर, नारळ मिक्स करून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कांदा, हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये उकडलेला बटाट्याच्या फोडी, हळद, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करून चपातीचे तुकडे घालून मिक्स करून परतून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून कोथंबीर, नारळ घालावा.