साबुदाणा थालीपीठ: उपास असला की आपल्या डोळ्यासमोर बरेच पदार्थ येतात. उपासासाठी वेगळे काहीतरी करावे असे वाटते. साबुदाणा खिचडी आपण नेहमी करतो.साबुदाण्याचे थालीपीठ करून बघा नक्की आवडेल. ह्यामध्ये साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. साबुदाणा थालीपीठ बनवतांना उकडलेला बटाटा, शेंगदाणे कुट, हिरवी मिरची, कोथंबीर व जिरे वापरले आहे. साबुदाणा थालीपीठ हे छान खमंग लागते. तसेच ह्यामध्ये थोडीसी लाल मिरची पावडर घातली आहे त्यामुळे थालपीठाला रंगपण चांगला येतो.
The English language version of the Sabudana Thalipeeth preparation method can be seen here- Sabudana Thalipeeth for Vrat/Upvas
साबुदाणा थालीपीठ बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: 5 बनतात
साहित्य:
१ कप भिजवलेला साबुदाणा
२ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
३ हिरव्या मिरच्या (कुटून)
१/४ कप शेंगदाणे कुट
२ टे स्पून कोथंबीर (बारीक चिरून)
१/२ टी स्पून जिरे
साखर व मीठ चवीने
वनस्पती तूप थालीपीठ भाजण्यासाठी
कृती:
साबुदाणा धुवून तो बुडेल इतपत पाणी घालून ६-७ तास तसेच बाजूला ठेवा. बटाटे उकडून सोलून किसून घ्या. हिरव्या मिरच्या कुटून घ्या. शेंगदाणे खमंग भाजून, सोलून जाडसर कुटून घ्या.
मग भिजवलेला साबुदाणा, किसलेले बटाटे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे कुट, कोथंबीर, लाल मिरची पावडर, साखर, मीठ व जिरे सर्व एकत्र करून चांगले मळून घ्या. मग त्याचे एक सारखे ५ गोळे बनवा. एक-एक गोळा घेवून एका प्लास्टिकवर थोडा पाण्याचा हबका मारून थापून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून एक टी स्पून तूप लावून प्लास्टिक वर थापलेले थालपीठ त्यावर घालून कडेनी थोडे तूप सोडून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम थालीपीठ दह्या बरोबर सर्व्ह करा.