पाकातले चविष्ट बेसन लाडू: बेसन लाडू हे पाकातले कसे बनवायचे. लाडू हा दिवाळी फराळाचा राजा म्हणतात. एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेसन लाडू, रवा लाडू, बुंदी लाडू, गव्हाच्या पीठाचे लाडू हे गणपती बाप्पांना फार आवडतात. त्यामुळे गणेश चतुर्थीला बनवायला छान आहेत. बेसन लाडू हे बीन पाकाचे व पाकाचे बनवता येतात. पाकातले बेसन व बीन पाकाचे बेसन लाडू बनवायला सोपे आहेत. पाकातले बेसन लाडू बनवतांना बेसन अगदी खमंग ब्राऊन रंगावर भाजून घ्यायला पाहिजे तसेच बेसन भाजून घेतल्यावर दुध घालून भाजलेले बेसन शिजवून घेतले पाहिजे म्हणजे लाडू खाताना चिकट होत नाहीत.
The English language version of the Pakatle Besan Ladoo can be seen here – Maharashtrian Besan Ladoo
पाकातले लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २५ लाडू बनतात
साहित्य:
३ कप बेसन (चणाडाळ पीठ)
१/२ कप दुध
१ १/४ कप साजूक तूप (घी)
१/४ कप वनस्पती तूप
१ टी स्पून वेलचीपूड
ड्रायफ्रुट (काजू/बदाम तुकडे)
थोडे किसमिस
पाक करण्यासाठी:
२ १/४ कप साखर
१ १/२ कप पाणी
कृती:
एका मोठ्या कढई मध्ये वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून मंद विस्तवावर बेसन भाजून घ्या. बेसन छान खमंग भाजून घ्या. बेसनाचा रंग ब्राऊन झाला पाहिजे नंतर त्यामध्ये दुध शिंपडून एक सारखे हलवून थोडेसे गरम करून घ्या मग बेसन फुलून येईल.
दुसऱ्या विस्तवावर साखर व पाणी घालून मंद विस्तवावर पाक तयार करायला ठेवा. पाक तयार करतांना मधून मधून सारखे हालवत रहा. पाक झाला की नाही हे पहाण्यासाठी बोटावर थोडा पाक घेवून त्याची एक तार आली पाहिजे व तो थोडा चिकट लागला पाहिजे.
पाक तयार झालाकी त्यामध्ये भाजलेले बेसन, वेलचीपूड, किसमिस व ड्रायफ्रुट घालून मिक्स करून घ्या. थोडे कोमट झाले की चांगले मळून घ्या. मळून झाले की त्याचे छान गोल लाडू वळून घ्या.