अननसाचा भात: अननसाचा भात हा कोणत्याही सणाला बनवायला छान आहे. ह्या भाताचा सुंगध फार छान येतो. बनवायला अगदी सोपा आहे तसेच लवकर होणारा आहे. अननसाचा भात बनवतांना ताजे अननसाचे तुकडे वापरले तरी चालतील किंवा टीन मधला अननस वापरला तरी चालेल. जेव्हा ताजे अननस वापरणार तेव्हा अननसाची साले काढून अननसाचे छोटे तुकडे करावे व त्यामध्ये २ टे स्पून साखर घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. पायनापल राईस दिसायला पण खूप छान दिसतो. सर्व्ह करतांना वरतून द्राक्षे, चेरीचे तुकडे घातले तर अजून छान दिसते.
The English language version of this rice dish can be seen here – Ananas Pulao
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
३ कप साखर
२ टे स्पून साजूक तूप
१ मध्यम आकाराचे अननस किंवा पायनापल टीन
२ थेंब पायनापल ईसेन्स
४ थेंब पिवळा रंग
फोडणीसाठी:
२ टे स्पून साजूक तूप
२ तुकडे दालचीनी
२ तमलपत्र
कृती:
अननस सोलून त्याचे लहान तुकडे करावे. त्यामध्ये दोन टे स्पून साखर घालून २-३ मिनिट शिजवून घ्यावे.
तांदूळ धुवून १५-२० मिनिट बाजूला ठेवावे.
एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये दालचीनी, तमलपत्र व धुतलेले तांदूळ घालून २-३ मिनिट परतून घ्यावे. मग त्यामध्ये ४ कप गरम पाणी घालून भात शिजवून घ्यावा.
भात शिजल्यावर परातीत थंड करायला ठेवावा. थंड झाल्यावर पिवळा रंग, पायनापल इसेन्स व साखर घालून मिक्स करावे.
मग भांड्यात एक भाताचा लेअर मग अननसाचे तुकडे परत भात त्यावर अननसाचे तुकडे असे लावून वरतून साजूक तूप घालून भांड्यावर झाकण ठेवावे व दोन चांगल्या वाफा आणाव्यात.
वाफ आल्यावर भात १५-२० मिनिट तसाच झाकून ठेवावा मग सर्व्ह करावा.