कैरीची डाळ: डाळ कैरीही महाराष्ट्रात लोकप्रिय डिश आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात गृहिणी हळदी कुंकूचा कार्यक्रम घरी ठेवतात तेव्हा घरी सौवाष्ण घरी बोलवून कैरीची डाळ, कैरीचे पन्हे व भिजवलेले हरभरे देण्याची फार जुनी परंपरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आंबटगोड अशी डाळ कैरी खूप छान लागते. डाळ कैरी नुसती खायलापन चांगली लागते. कैरीची डाळ बनवायला खूप सोपी आहे व झटपट पण बनते. ती बनवतांना डाळ ४ तासतरी भिजवून जाड सर वाटून कैरी, हिरवी मिरची, मीठ व साखर घालून जाड सर वाटून वरतून फोडणी घालून सर्व्ह करावी. फोडणी घातल्यामुळे छान खमंग लागते. कोकणातील ही एक पारंपारिक डीश आहे. जेवणामध्ये तोंडी लावायला हे डीश छान आहे.
The English language version of the preparation method of this Dal Kairi recipe is published here – Tasty Kairichi Dal
चणाडाळ भिजवण्यासाठी वेळ: ४ तास
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप हरभरा डाळ
१/२ कप कैरी (किसून)
३ हिरव्या मिरच्या
साखर व मीठ चवीने
फोडणीसाठी:
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
१ हिरवी मिरची (चिरून)
कृती: प्रथम चणाडाळ धुवून ४ तास भिजत ठेवावी.
डाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ, हिरवी मिरची, मीठ, साखर एकत्र करून मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर जाडसर वाटून घ्यावे. मग त्यामध्ये किसलेली कैरी घालून मिक्स करावे.
फोडणीच्या वाटीत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, हळद व एक हिरवी मिरची चिरून घालावी व वाटलेल्या डाळीवर फोडणी थोडीसी कोमट झाल्यावर घालावी. मिक्स करून मग सर्व्ह करावी.
ही वाटलेली डाळ व पन्हे खूप छान लागते.