चिकन खिमा वड्या: चिकनच्या खिम्याचे आपण समोसे, पोहे, कबाब बनवतो. पण चिकन खिमा वड्या हा एक छान प्रकार आहे. जेवणामध्ये तोंडी लावायला किंवा स्टारटर म्हणून सुद्धा बनवता येतो.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/२ किलो ग्राम चिकन खिमा
तूप खिमा वड्या तळायला
२ अंडी (फेटून)
मसाल्यासाठी
१ मोठा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले (पेस्ट)
१ टेस्पून लसूण (पेस्ट)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
१/२ टी स्पून दालचीनी पावडर
१/४ टी स्पून मिरे पावडर
१/४ टी स्पून वेलचीपूड
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
कृती:
चिकन खिमा धुवून घेऊन चाळणीत निथळत ठेवा.
कांदा, आले, लसूण, चिरलेली कोथंबीर, चिरलेली पुदिना पाने, दालचीनी पावडर, मिरे पावडर, वेलचीपूड गरम मसाला एकत्र करून निथळलेल्या खिम्याला लाऊन पाच मिनिट ठेवावे. मग एका प्लेट मध्ये थापून घ्यावे.
मोदक पात्रात पाणी घालून खिमा थापलेली प्लेट मोदक पात्रात ठेवून पंधरा मिनिट उकडून घ्या.
थंड झाल्यावर त्याच्या मध्यम आकाराच्या वड्या कापून घ्या.
अंडे चांगले फेटून घ्या. एक एक वडी अंड्याच्या मिश्रणात बुडवून घ्या. मग तव्यावर गरम तुपात तळून घ्या.
गरम गरम चिकन खिमा वड्या टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.