फोडणीची कोथबीर वडी: कोथंबीर वडी ही जेवणात साईड डीश म्हणून करता येते. कोथंबीरीच्या वड्या चवीला अगदी चवीस्ट लागतात. ह्या वड्या पचायला हलक्या असतात. तसेच ह्या वड्या शालो फ्राय केलेल्या चांगल्या लागतात पण वरतून फोडणी दिलेली सुद्धा छान लागते. फोडणी दिल्याने चांगल्या खमंग लागतात.
बनवण्यासाठी वेळ: 30
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
१ कोथंबीर जुडी
१ कप डाळीचे पीठ (बेसन)
१/२ कप ज्वारीचे पीठ
७ हिरव्या मिरच्या
७ लसूण पाकळ्या
१/२” आले तुकड
१ टी स्पून जिरे (कुटून)
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टे स्पून तीळ
१०-१५ कडीपत्ता पाने
१/२” आले तुकड
कृती:
कोथंबीर निवडून, धुवून बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची-आले-लसूण बारीक वाटुन घ्या.
एका मोठ्या घमेल्यात किंवा परातीत चिरलेली कोथंबीर, आले-लसणाच वाटण, मीठ, हळद, हिंग, बेसन, बाजरीचे पीठ घालून चांगले मळून घेऊन त्याच्या २-३ वळकटी बनवा. कुकरमध्ये जे भांडे ठेवायचे आहे त्याला तेलाचा हात लाऊन कोथंबीरीच्या वळकटी ठेवून कुकरचे झाकण लाऊन दोन शिट्या काढाव्यात. कुकर थंड झाल्यावर भांडे बाहेर काढून कोथंबीरीच्या वड्या थंड करायला ठेवाव्यात. मग एक सारख्या कापून घ्याव्यात व एका बाऊल मध्ये ठेवाव्यात.
कढईमधे तेल गरम करून मोहरी, कडीपत्ता ,तीळ घालून फोडणी वड्यावर घालावी.