शेवेची रेस्टॉरंट भाजी: शेवेची भाजी तांदळ्याच्या भाकरी बरोबर छान लागते. ही भाजी घरी कोणी अचानक पाहुणे आले व घरी शेव असेल तर झटपट वेगळी डीश बनवायला छान आहे. शेवेची भाजी बनवतांना एक लक्षात ठेवा शेवे मध्ये मीठ असते त्यामुळे भाजी मध्ये मीठ घालतांना जरा मीठ जपूनच घाला. कांदा टोमाटोनी छान चव येते. दिवाळीच्या फराळासाठी बनवलेली शेव जास्त राहिली असेल तर ही भाजी बनवा नाहीतरी गोड खाऊन कंटाळा येतो मग जेवणात अश्या प्रकाराची चमचमीत भाजी बनवायला छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप तिखट शेव
१ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
२ मध्यम आकाराचे टोमाटो
मीठ चवीने
१ कप दुध
१/२ टी स्पून मिरे पावडर
कोथंबीर सजावटीसाठी
कृती: कांदा व कोथंबीर बारीक चिरून घ्या. टोमाटो उकडून, सोलून, मिक्सरमध्ये ग्राईड करून, गाळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून जिरे घालून बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा थोडा परतून झालाकी चिरलेला टोमाटो घालून टोमाटो शिजेपरंत परतून घ्या. मग त्यामध्ये दुध घालून थोडे दुध आटे परंत उकळी आणा. दुध थोडे आटलेकी मिरे पावडर घालून शेव घाला. भाजीचा रंग बदलला की भाजी खाली उतरून ठेवा.
गरम गरम भाजी कोथंबीर घालून सजवून चपाती, तांदळाची भाकरी अथवा परोठ्या बरोबर सर्व्ह करा.