कोबीचे वडे: कोबीचे वडे ही एक जेवणातील किंवा नाश्त्याला किंवा लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. कोबीचे बडे बनवतांना उडदाची डाळ भिजवून वाटून घेतली आहे व त्यामध्ये कांदा, कोबी उभा पातळ चिरून घातला आहे. तसेच हिरवी मिरची, हिंग व कोथंबीर घातल्यामुळे वड्याची चव अजून छान लागते.
The English language version of the same Gogi Pakoda recipe and preparation method can be seen here – Crispy Cabbage Pakodas
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/२ कप उडीदडाळ
१ हिरवी मिरची
१/२ टी स्पून हिंग
३/४ कप कोबी (उभा पातळ चिरून)
१/२ कप कांदा (उभा पातळ चिरून)
१ टे स्पून हिरवे मटार (उकडून)
१/४ कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल कोबीचे वडे तळण्यासाठी
कृती:
उडदाची डाळ धुवून त्यामध्ये पाणी घालून दोन तास भिजत ठेवा. दोन तासांनी पाणी काढून टाका. कांदा, कोबी उभा पातळ चिरून घ्या. कोथंबीर चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात उडीदडाळ, हिंग, हिरवी मिरची व १/४ कप पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढून ठेवा. मग त्यामध्ये चिरलेला कांदा, कोबी, मीठ, कोथंबीर घालून मिश्रण चांगले मिक्स करून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. हाताची बोटे ओली करून थोडे मिश्रण घेऊन अंगठ्याने थोडे मध्ये दाबून एक भोक पडून गरम तेलामध्ये अलगद सोडून मध्यम विस्तव ठेवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
गरम गरम कोबीचे वडे टोमाटो सॉस बरोबर सर्व करा.