खाद्यपदार्थ मधील भेसळ व ती शोधण्याचे घरगुती प्रयोग
हिंगामध्ये वास व रंग लावून रेसिन किंवा डिंक मिसळतात. शुद्ध हिंग पाण्यात विरघळतो व पांढरे मिश्रण तयार होते. शुद्ध हिंग जाळल्यास स्वच्छ ज्योत निघते.
बाजरीमध्ये अरगॉट मिसळलेले असण्याची शक्यता असते. बाजरी पाण्यात टाकून पहा, अरगॉट असल्यास ते वर तरंगेल.
बुरा साखरेमध्ये धुण्याचा सोडा घालून भेसळ करतात. त्यावर हायड्रोक्लोरिक असिड टाकून पहा, फेस आल्यास भेसळ सिद्ध होईल. हीच परीक्षा पाण्यात बुडवलेला लाल लिटमस पेपर टाकून करता येईल. भेसळ आसल्यास सोड्यामुळे लिटमस पेपर निळा होईल.
विलायचीमधील तेल काढून घेतात व उरलेला दाण्यांना टाल्कम पावडर लावतात. बोटांनी जोरात घासल्यावर टाल्कम पावडर हाताला लागेल.
लाल मिरच्याच्या पुडीत रंग लावलेला लाकडाचा भुसा मिसळला जातो. पाण्यात टाकल्यास भुसा वर तरंगेल व रंग पाण्यात सुटेल.
कॉफीमध्ये चीकोरी मिसळली आहे काय हे पाहण्यासाठी ही कॉफी पाण्यात टाकावी. कॉफी तरंगेल, चीकोरी तळाशी जाऊन बसेल.
शुद्ध तुपात वनस्पती तूप मिसळले जाते. ते शोधण्यासाठी एक चमचा साखर १० सी. सी. हायड्रोक्लोरिक असिडमध्ये विरघळवा. त्यात १० सी.सी. तूप मिसळा चांगले हलवा. दहा मिनिट तसेच राहू द्या. वनस्पती मिसळलेले असेल तर पाण्यासारखा लालसर थर वर येईल.
रव्यामध्ये लोखंड वा पोलादाचा चुरा मिसळतात. रव्यामधून लोहचुंबक फिरवल्यास क्षणात परीक्षा होईल.
केशर आधीच महाग असते, शिवाय त्यात मक्याचे रंगवलेले व सुगंध लावलेले केस मिसळलेले असण्याची शक्यता असते. चांगले खरे केसर कडक असते. कृत्रिम काड्या लगेच तुटतील. चांगले केसर पाण्यात विरघळते, केसरी रंग येतो. केशरावर थोडे सल्फुरिक असिड टाकल्यावर केशराचा रंग काळसर लाल झाला तर अस्सल व निळा झाल्यास नकली समजावे.
कुटलेल्या सुपारीत लाकडाची सालपटे, भुसा रंग लावून मिसळतात. सुपारी पाण्यावर शिंपडून पहा. लाकडाची सालपटे वर तरंगतील व रंग सुटेल.
वापरलेल्या चहाचीच पाने वाळवून, चांगल्या चहात मिसळतात. हा चहा ओल्या सफेद कागदावर पसरल्यास रंग सुटेल.
चांगला व खरा मध ओळखण्यासाठी पेला भर पाणी घेऊन त्यात मधाचे काही थेंब टाकावे. ते थेंब तळाशी जाऊन तेथेच राहिले तर मध अस्सल आहे असे समजावे. पण तेच पाण्यात मिसळल्यास तो मध कृत्रिम आहे असे समजावे.