बाजरीची[Pearl Millet] भाकरी (ही भाकरी भोगीच्या दिवशी बनवतात). संक्रांत हा सण जानेवारी मध्ये येतो व तेव्हा थंडी पण असते. बाजरीची भाकरी ही शरीराला गरम असते. म्हणून थंडीच्या दिवसात मुद्दाम बाजरी ची भाकरी करतात. त्यावर तीळ [Sesame Seeds] लावले तर त्याची चव छान लागते.
बाजरीची भाकरी
साहित्य
२ वाटी बाजरीचे पीठ
२ मोठे चमचे तीळ
पाणी
कृती
१ १/२ बाजरीचे पीठ एका परातीत (१/२ वाटी पीठ भाकरी थापायला ठेवावे) घेवून थोडे थोडे पाणी घालून चांगले मळून घ्या व त्याचे तीन एकसारखे भाग करा. एक भाग घेवून चांगला मळून घ्या. परातीत थोडे कोरडे बाजरीचे पीठ घेवून त्यामध्ये १ छोटा चमचा तीळ मिक्स करावे व त्यावर पातळसारखी भाकरी थापून घ्या.
थोडा खोलगट जाड तवा चांगला गरम करून थापलेली भाकरी अलगद उचलून पिठाकडची बाजू वर करून तव्यावर टाकावी व भाकरीवर पाण्याचा हाथ फिरवावा मग १ छोटा चमचा तीळ टाकावेत . भाकरी वरचे पाणी सुकले की उलट करावी.
नंतर तवा काढून विस्तवावर भाजावी फुगली की खाली उतरवून त्याचा पापुद्रा थोडा काढून साजूक तूप लावावे व घडी करून ठेवावी.
(भाकरीचे पीठ जुने असता कामा नये नाहीतर भाकरी कडवट लागते.)