रवा नारळ लाडू हे फार चवीस्ट लागतात. रवा व नारळ चांगला भाजून घेतला की खमंग लागतो. हे लाडू ६-७ दिवसाच्या वर टिकत नाही कारण ह्यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे. पण नारळ घालून लाडू चवीस्ट लागतात. नारळ न घालता पण हे लाडू बनवता येतात. ह्यामध्ये वेलचीपूड बरोबर जायफळ पूड पण छान लागते. त्यामुळे सुगंध पण छान येतो.
साहित्य : ४ कप बारीक रवा, १ कप नारळाचा चव, १ कप तूप, ३ कप साखर, ३/४ कप खवा (थोडा भाजून घ्या), १ टी स्पून जायफळ पूड, १ टी स्पून वेलची पूड, थोडे काजू, बदाम, बेदाणे (तुकडे करून)
कृती : एका कढई मध्ये तूप गरम करून रवा मिक्स करा व रवा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. रवा हलका झाला पाहिजे. मग खोवलेला नारळ घालून मंद विस्तवावर ५ मिनिट भाजा. नंतर त्यामध्ये भाजलेला खवा घालून मिक्स करा. दुसऱ्या विस्तवावर पाक बनवायला ठेवा. पाकसाठी ३ कप साखर, दीड कप पाणी घालून एकतारी पाक बनवा. पाक झाल्यावर १/२ कप पाक बाजूला काढून ठेवा. मग कढईतील पाकामध्ये जायफळ पूड व वेलचीपूड मिक्स करा व भाजलेला रवा घाला व मिक्स करा थोडावेळ तसेच झाकून ठेवा. नंतर त्यामध्ये काजू, बदाम, बेदाणे मिक्स करा. लाडू वळून घ्या. जर मिश्रण कोरडे वाटले तर १/२ कप पाक काढून ठेवला होता तो मिक्स करा. व लाडू वळून घ्या.
my favorite coconut ladoo. now I can make. thanks to help.