कांदा पोहे : कांदा पोहे म्हंटले की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येते. महाराष्ट्रियान लोकांची ही आवडती डीश तसेच महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. एक गंमत आहे पूर्वीच्या काळी जेव्हा मुलगा व मुलाकडचे लोक लग्नासाठी मुलगी पहायला जायचे तेव्हा मुलीकडचे चहा व पोहे बनवायचे हा मेनू नक्की ठरलेला असयचा. मग मुलाला व मुलीला सगळे चिडवायचे काय मग आज कांदा पोहे आहेत वाटत मग मुलगी लाजून जायची. पण आता पद्धत (ट्रेंड) बदलला आहे. आता आपण पोहे नेहमी करतो. परत आता पोहे वेगवेगळ्या प्रकारे बनवले जातात. मुलांना शाळेत जातांना डब्यात देता येतात. परत लवकर बनतात. पोहे आपल्याला कांदा पोहे, दडपे पोहे, दुध पोहे, चायनीज पोहे ईत्यादि प्रकारे बनवता येतात.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २-३ जणांसाठी
The English language version of the Kanda Poha recipe can be seen in the article – Here
साहित्य : २ कप जाडे पोहे, १ थोडा मोठा कांदा, ३ हिरव्या मिरच्या, १ छोटा बटाटा (उकडून), मीठ व साखर चवीने, १ छोटे लिंबू रस, १/२ टे स्पून वनस्पती तूप
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, ५-६ कडीपत्ता पाने, १/४ टी स्पून हळद
सजावटीसाठी : १/४ कप कोथंबीर, १/४ कप ओला नारळ (खोवून), बारीक शेव
कृती : पोहे चाळणी मध्ये भिजवून घ्यावे. कांदा उभा पातळ चिरावा, बटाटे उकडून, सोलून तुकडे करावे, मिरच्या थोड्या मोठ्या कापाव्यात, नारळ खोवून घ्या, कोथंबीर धुवून चिरून घ्या. नंतर धुतलेल्या पोह्याला मीठ, लिंबू व साखर लावून ठेवा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, मग कांदा घालून थोडा गुलाबी रंगावर ओर्तून घ्या. कांदा परतल्यावर त्यामध्ये उकडलेले बटाटे, हळद, अगदी थोडे मीठ घालून मिक्स करावे, नंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे, वनस्पती तूप, कोथंबीर व खोवलेला नारळ घालून मिक्स करून कढई झाकून ठेवावी. दोन चांगल्या वाफा येवू द्याव्या. मधून एकदा पोहे झाऱ्याने हलवावेत.
सर्व्ह करतांना वरतून कोथंबीर, नारळ घालावा. आवडत असल्यास बारीक शेव घालावी.
टीप : पोहे पातळ वापरू नये किंवा दगडी पोहे वापरू नयेत.
उकडलेल्या बटाट्या आयवजी मटार च्या सीझन मध्ये मटार वापरावा पोहे चवीस्ट लागतात.
वनस्पती तूप घातल्याने चव फार छान लागते.
जर चातुर्मासात कांदा खायचा नसेल तर कांद्याच्या आयवजी कोबी पातळ चिरून घालावा.
उकडलेल्या बटाट्या आयवजी कच्चा बटाटा सोलून पातळ चकत्या करून घालाव्या चव चांगली लागते.