तोंडलीची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी परतून चांगली लागते. लहान मुले आवडीने खातात. ही भाजी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. तोंडलीची भाजी बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. तसेच शेंगदाणे कुट घालून ह्याची चव पण चांगली लागते. कडीपत्ता नेहमी चिरून टाका म्हणजे तो खाल्ला जातो. नाहीतर लहान मुले तो काढून टाकतात. तसेच हिरव्या मिरचीचे मोठे तुकडे करावेत म्हणजे सहज काढता येतात.
तोंडलीची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
The Marathi language video of this Maharashtrian Style Tasty Tondalichi Bhaji can be seen on our YouTube Channel: Maharashtrian Konkani Style Tasty Tondalichi Bhaji
The English version of the Tondli vegetable dish is given in the article – Here
साहित्य :
२५० ग्राम तोंडली (कोवळी)
१ मध्यम कांदा (चिरून)
२ हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करून)
१ टे स्पून शेंगदाणे कुट
१ टे स्पून कोथंबीर
१ टे स्पून नारळ (खोवून)
१ टी स्पून साखर
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
७-८ कडीपत्ता पाने (चिरून)
१/४ टी स्पून हळद पावडर
कृती :
तोंडली धुवून उभी चिरावी. व चिरून झाल्यावर परत पाण्यात घालावी म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो.
कढई मध्ये तेल गरम करून फडणी तयार करा मग त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून २-३ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला तोंडली घालून मिक्स करा. कढई वर झाकण ठेवून झाकणावर थोडेसे पाणी घालावे. भाजी मंद विस्तवावर शिजू ध्यावी. अधून मधून हलवावी.
तोंडली शिजल्यावर त्यामध्ये शेंगदाणे कुट, कोथंबीर, खोवलेला नारळ, मीठ व साखर घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्यावी.
टीप : तोंड्ल्याचा एक गुणधर्म आहे जर जिभेला चिरा झाल्या असतील किंवा तोंड आले असेल तर कच्चे तोंडले खावे त्याने चिरा बऱ्या होतात.
तोंडली ही गोड, थंड, अरुची दूर करणारी आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांना ती खूप फायद्याची आहे. पण तोंडली ही पचण्यास जड आहेत.